तभा वृत्तसेवा
बाभुळगाव,
nagar-panchayat-garbage-depot-transaction : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कचराडेपोची निर्मिती करण्याच्या उद्देशाने नगर पंचायतने शेतजमीन थेट वाटाघाटीने खरेदी केली. मात्र ही शेतजमीन खरेदी करताना शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करून शासनाच्या लाखो रूपयांचा अक्षरशः चुराडा करण्यात आला. या खरेदी व्यवहारात शासनाची फसवणूक झाल्याचा प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल सहारे यांनी उघडकीस आणून या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकाèयांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मुलन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले असून तसे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी, यवतमाळ कार्यालयात धडकले आहे.
बाभूळगाव नगर पंचायतने संकलीत कचरा साठवणूक व प्रकिया करण्यासाठी डंपिंग ग्राउंड निर्माण करण्यासाठी शेतजमीन थेट वाटाघाटी पद्धतीने खरेदी केली. त्याबाबत 2022 मध्ये निविदा प्रक्रिया नगर पंचायत बाभुळगावद्वारे राबविण्यात आली. त्यामध्ये शेख आसीफ शेख इमाम, रा. बाभुळगाव यांनी त्यांच्या गणोरी शिवारातील गट क्र. 114 क्षेत्रफळ 1.31 हेक्टर आर. या शेतजमिनीबाबत 29 सप्टेंबर 2022 रोजी नगर पंचायतकडे अर्ज सादर केला होता.
मात्र या अर्जासोबत त्यांनी मालकीहक्क बाबतचा कुठलाही ठोस पुरावा जोडला नव्हता. वास्तविक पाहता शेतमालक निविदा भरतेवेळी त्या शेतजमीनीचा मालकच नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा सर्व व्यवहारच संशयास्पद व शासनाची फसवणूक करणारा असल्याची तक्रार राहुल सहारे यांनी जिल्हाधिकाèयांकडे पुराव्यासहित दाखल केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालातील भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदारांनी 6 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास यवतमाळ यांना पत्र पाठविले आहे.
त्यामध्ये संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे. आता या प्रकरणी चौकशी समिती अपहार उघडकीस आणणार, याकडे बाभुळगाववासी नागरिकांचे लक्ष लागले आहे.