नागपूर,
nagpurs-first-animal-cremation-center नागपूरातील वैरागरे कुटुंबासाठी तो दिवस अविस्मरणीय ठरला. मुसळधार पावसाच्या वृष्टीत त्यांच्या लाडक्या पाळीव कुत्रा कोकोचा अचानक झालेला मृत्यू आणि त्याहून वेदनादायक ठरले ते त्याच्या अंतिम संस्कारासाठी योग्य जागा न सापडणे. या कुटुंबानी अनुभवलेली ही असहाय्यता अनेक पाळीव प्राणी पालकांचीही वास्तवातली कथा आहे. याच वेदनेतून नागपूरचे पहिले प्राणीदहन केंद्र जन्माला आले.

‘राईज फॉर टेल्स’ केंद्रात उभारलेल्या या दहनभूमीत पाळीव असो वा भटका प्रत्येक प्राण्याला सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. हे केवळ एक केंद्र नव्हे तर प्रत्येक भावनाशील प्राणीप्रेमीच्या मनावरचा एक ओझे कमी करणारा, अत्यंत मानवी रूप असलेला उपक्रम आहे. nagpurs-first-animal-cremation-center याचबरोबर अपघात, लकवा किंवा शस्त्रक्रियेनंतर प्राण्यांना पुन्हा चालता-बोलता करण्यासाठी केंद्रातर्फे हायड्रोथेरपी ही अत्याधुनिक उपचार प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. या केंद्रात “जिव हाच जिवाला ओळखतो” या भावनेतून काम करणाऱ्या १० सदस्यांची प्रशिक्षित टीम २४×७ कार्यरत असते. ऑपरेशन थिएटर, हॉस्पिटल वॉर्ड, सबसिडाइज्ड ओपीडी, अॅम्ब्युलन्स, दोन डॉक्टर असलेल्या या केंद्रात गेल्या पाच वर्षांत १० हजारहून अधिक प्राण्यांचा उपचार, ५ हजारहून अधिक प्राण्यांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लस देऊन शहरातील मानव- प्राणी संघर्ष लक्षणीयरीत्या कमी करण्यात योगदान दिले आहे.
प्राणी प्रेम आणि सहअस्तित्वाची बीजे रोवण्यासाठी ‘सहजीवन – अ कोएक्झिस्टन्स प्रोजेक्ट’ही उपक्रम राबवला जात आहे. शाळांतील मुलांशी संवाद करून त्यांना करुणा, जबाबदारी आणि प्राणी संरक्षण कायद्यांबद्दल माहिती दिली जाते. कुत्र्याने चावा घेतल्यास काय करावे किंवा रेबीजविषयी जागृती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर शिक्षण दिले जाते. कोकोच्या वेदनेतून सुरू झालेली ही वाटचाल आज नागपूरला अधिक संवेदनशील, करुणामय आणि समावेशक शहर बनवण्याची दिशा देत आहे