पवनकुमार लढ्ढा चिखली
चिखली,
nikhil on the kbc चिखली शहराचा अभिमान ठरलेला निखिल मेहेत्रे यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर दमदार उपस्थिती लावत संपूर्ण शहराला अभिमानाची अनुभूती दिली आहे. मंगळवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये निखिल महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देताना देशभरातील प्रेक्षकांच्या नजरेत भरले. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट पार करीत येत त्यांनी प्रतिष्ठेच्या या मंचावर स्थान मिळवले.
अमिताभ बच्चन यांच्याशी मनापासून संवाद
एपिसोडमध्ये निखिल यांनी बिग बींशी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, धैर्य आणि पुनरुत्थानाचा प्रवास शेअर केला. अत्यंत सौहार्दपूर्ण संवादात अमिताभ बच्चन यांनी निखिलचे कौतुक करत त्यांच्या संघर्षाची सखोल माहिती घेतली. आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश असताना झालेल्या अपघातामुळे निखिल यांना अपंगत्व प्राप्त झाले. या अपघाताने त्यांचे वैद्यकीय शिक्षण थांबले, करिअर कोसळल्यासारखे झाले, पण निखिल खचले नाहीत.या धक्क्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा उभारी घेतली आणि आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला.अमिताभ बच्चन यांनी निखिलच्या या अदम्य जिद्दीचे मनापासून कौतुक केले. त्यांची नम्रता, विनोदबुद्धी आणि संवादातून येणारा सकारात्मक भाव निखिलला प्रेरणादायी जाणवला.
दहा वर्षांचा संघर्ष आणि हॉट सीटवरचा विजय
निखिल गेल्या दहा वर्षांपासून केबीसीसाठी तयारी करत होते. कधी फोन बुकिंग मिळेना, कधी ऑडिशनची संधी मिळेना, तर कधी अंतिम टप्प्यात नाव निघेना… परंतु त्यांनी हार मानली नाही. विविध क्विझ पुस्तके, सामान्यज्ञान अभ्यास, मॉक क्विझ आणि सातत्य या सर्वांच्या बळावर त्यांनी स्वतःला तयार केले.अखेर दहा वर्षांच्या कठोर मेहनतीचा सुवर्णक्षण त्यांच्या वाट्याला आला आणि ते केबीसीच्या हॉट सीटवर पोहोचले.
निखिल यांनी डी. फार्म. शिक्षण पूर्ण केले असून लवकरच वैद्यकीय दुकान सुरू करण्याचा मानस आहे. बदलत्या परिस्थितीतही त्यांनी आत्मविश्वास हरवला नाही हीच त्यांची खरी जमेची बाजू.
कुटुंबाचा आधार आणि प्रेरणा
निखिल हे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र नामदेवराव मेहेत्रे यांचे पुत्र. अपघातानंतरच्या काळात कुटुंबाने निखिलला दिलेला मानसिक आधार, प्रोत्साहन आणि साथ हे त्यांच्या पुनरुत्थानाचे मुख्य स्तंभ ठरले.nikhil on the kbc कुटुंबाचा आत्मविश्वास आणि सोबत असल्यामुळे निखिलने पुन्हा आयुष्यातील नवीन दिशा स्वीकारली. त्यांच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये आणि शिक्षणक्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
दिव्यांगत्वावर मात करत देशातील प्रतिष्ठित मंचावर पोहोचलेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
निखिलची कथा न थांबणाऱ्या आशावादाची
अडचणींना संधीमध्ये बदलण्याचा प्रत्यय देणारी निखिल मेहेत्रे यांची ही कहाणी केवळ चिखलीसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटांवर विजय मिळवत हसतमुखाने पुढे चालत राहणे म्हणजे निखिल अशी ओळख त्यांनी संपूर्ण देशासमोर निर्माण केली आहे.