छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदाचे 2 तर नगरसेवकांचे 18 अर्ज अवैध

तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
Scrutiny Process : नगर परिषद निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 11 अर्जापैकी 9 अर्ज वैध ठरले असून 2 अर्ज अवैध घोषित करण्यात आले. तर नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या 108 अर्जांपैकी 90 अर्ज वैध व 18 अर्ज अवैध ठरले.
 
 
 
jk
 
 
 
ही छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय साळवे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या देखरेखीत पार पडली.
 
 
अर्जदार उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, कोणत्याही उमेदवाराने इतर उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप न नोंदविल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, भाजपा, शिंदे शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन, राष्ट्रवादी (अप), विदर्भ विकास आघाडी आणि अपक्ष अशा विविध पक्षा-गटांकडून अर्ज दाखल झाले होते. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म न दिलेल्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
 
 
नप अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे परेश कारिया, भाजपाचे महेश पवार, शिंदे शिवसेनेकडून गजानन ढवळे, वंचित बहुजनचे संघपाल कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) व विदर्भ विकास आघाडीचे शैलेश ठाकूर, अपक्ष दत्ता गटलेवार, अक्षय आडे, सुधाकर अक्कलवार यांचे अर्ज वैध ठरले.
 
 
तर नगरसेवक पदासाठी प्राप्त 108 अर्जांपैकी 18 अवैध ठरले असून 90 उमेदवार रिंगणात कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर असून या दिवशी नेमक्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी घाटंजीत तिरंगी लढत निश्चित असून छानणीनंतरचे राजकीय वातावरण चुरशीचे बनणार आहे.