तुळजापूर,
Tuljapur drugs case : धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाभोवतीचा वाद चांगलाच पेटला असून सुप्रिया सुळे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सुप्रिया सुळेंनी भाजपावर आरोप करत या प्रकरणातील आरोपीला पक्षात घेतल्याचा हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना राणा पाटलांनी त्यांना खुले पत्र लिहून सर्व आरोप फेटाळले आणि सुळे चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीद्वारे राजकीय अपरिहार्यतेतून वक्तव्य करत असल्याचा दावा केला.
राणा पाटलांनी स्पष्ट केले की माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर हे भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचेच नेते होते आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई न करणे योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, राज्यातील मंत्र्यांवर गंभीर आरोप असतानाही त्यांना पदावर ठेवण्याचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.
राणा पाटलांचे म्हणणे आहे की ड्रग्ज प्रकरण उघडकीस येण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांनाच आरोपी बनवण्यात आले. स्थानिक महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना माहिती पुरवली, पाठपुरावा केला, मात्र पोलिसांनी माहिती देणाऱ्यांनाच गुन्ह्यात ओढल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायालयाने देखील जामिनाच्या आदेशात हे मुद्दे नमूद केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यांमुळे तुळजापूरच्या तिर्थक्षेत्राची बदनामी होत असल्याचा आरोप करत राणांनी हे वक्तव्य राजकीय मीडिया ट्रायलसारखे वाटत असल्याचेही म्हटले. अंजली दमानियांच्या तेरणा ट्रस्टविषयी केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ट्रस्टने फक्त निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे सांगितले आणि त्यात गैरकायदेशीर काही नसल्याचा दावा केला.
सुप्रिया सुळे यांना खुले पत्र
आपण तयार असलेल्या सर्व माहिती आणि पुराव्यांसह चर्चा करण्याचे खुले आवाहन करत राणा पाटील यांनी या प्रकरणात वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याचे सांगितले. या वादामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण अधिकच गाजत असून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत.