वर्धा,
vc sharma विश्वविद्यापीठाचा परिसर आणि वातावरण जीवनाला दिशा देण्यासाठी पोषक आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामंजस्य आणि सहयोगाचे व्यासपीठ तयार करण्यासाठी विश्वविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांनी केले. त्या शिक्षण विद्यापीठ आणि व्यवस्थापन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अभिविन्यास कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. कस्तुरबा सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. गोपालकृष्ण ठाकूर, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र बोरकर, कुलसचिव कादर नवाज खान आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गादेवार व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. शर्मा पुढे म्हणाल्या की, विश्वास आणि आत्मविश्वासाच्या या वातावरणाचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घेऊन आपले जीवन यशस्वी केले पाहिजे. सन १९७५ मध्ये नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी संमेलनात विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला गेला होता. प्रस्तावानुसार महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. हिंदी भाषेसोबतच संस्कृतीला जागतिक स्तरावर पोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विद्यापीठावर आहे. चांगल्या मूल्यांच्या प्रकाशात तुम्हाला पुढे जायचे आहे.vc sharma विद्यापीठाला उंचीवर पोहोचवणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. ज्ञानात सतत वाढ करून आपण विद्यापीठाच्या अकादमिक वातावरणाच्या उन्नतीस हातभार लावायला हवा असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. गोपालकृष्ण ठाकूर, डॉ. रविंद्र बोरकर, कादर नवाज खान आणि डॉ. सुरेंद्र गाडेवार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास आणि आयुष्यातील यशाचा मंत्र सांगितला आणि विद्यापीठाच्या विकासात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले. संचालन प्रा. डॉ. सीमा बर्गट यांनी केले तर डॉ. धर्मेंद्र शंभरेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षण आणि व्यवस्थापन विद्यापीठाचे शिक्षक डॉ. हेमचंद्र ससाने, डॉ. गौरी शर्मा, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. संदीप पाटील, डॉ. राम अवध, डॉ. अनिकेत आंबेकर, डॉ. धीरज मसराम, डॉ. सारिका राय शर्मा, डॉ. अखिलेश यादव, डॉ. पंकज चौधरी, हिंदी अधिकारी राजेश यादर, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.