महावितरणचे थकले २२.८ कोटी

*थकबाकी वसुली मोहीम सुरू

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news : जिल्ह्यातील नागरिकांना औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व कृषी वापरासाठी महावितरण विद्युत पुरवठा करते. पण, विद्युत देयक वेळीच अदा करण्याचे टाळले जाते. सध्या ग्राहकांकडे विद्युत देयकापोटी महावितरणचे तब्बल २२.८ कोटी थकल्याचे पुढे आले आहे. या थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी महावितरणच्या वतीने विशेष थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. विद्युत देयक वेळीच अदा न करणार्‍यांवर कठोर कारवाईही करण्याची तयारी महावितरणने दर्शविली आहे.
 
 
jk
 
 
जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या तीन उपविभागांत सुमारे ३ लाख २५ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. ऑटोबर अखेरपर्यंत या तीन उपविभागांत घरगुती वीज ग्राहकांवर विद्युत देयकापोटी १७ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे. व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुमारे २२ हजार असून त्यांच्यावर ३.५४ कोटींचे देयक थकलेले आहेत. औद्योगिक ग्राहकांची संख्या ४७२५ असून त्यांच्यावर तब्बल २ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. हिच थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणच्या वतीने विशेष थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. आर्वी उपविभागात ५.४२ कोटींची थकबाकी आहे. हिंगणघाट उपविभागात ६.४२ कोटी तर वर्धा उपविभागात सर्वात जास्त १०.९६ कोटींची थकबाकी आहे.