अमरावती शासकीय अभियांत्रिकीत सीआयआयआयटी मंजूर

२०० कोटींचा होणार खर्च,आ. सुलभा खोडके यांचे प्रयत्न

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
अमरावती,
Amravati government engineering college जिल्ह्यातील तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारण्यास व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात खाजगी सहभागातून सीआयआयआयटीच्या कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आ. सुलभा संजय खोडके यांनी मागील सहा महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केंद्र उभारण्यास मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे. या केंद्रा हजारो विद्यार्थांना लाभ होणार आहे.
 

Amravati government engineering college 
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इक्यूबेशन अँड ट्रेनिंग प्रकल्पाची उभारणी करण्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या २५ मार्च रोजी पत्र जारी करून तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश निर्गमित केले. आ. सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सीआयआयआयटी कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यासंदर्भात २० जून रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून प्रस्ताव मागविला होता. तद्नंतर या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड द्वारा भारतात कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम राज्यात हे यशस्वीरित्या कौशल्यवर्धन केंद्र पूर्ण केले आहे महाराष्ट्र सरकारच्या मदतीने गडचिरोलीमध्येही असेच केंद्र यशस्वीरित्या सुरू झाले आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यात सुद्धा सीआयआयआयटीच्या कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्याबाबत आ. यांचा मागील सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरु होता. आता त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्या संदर्भातले पत्र टाटा टेक्नोलॉजी लिमिटेडचे उपाध्यक्षचे उपाध्यक्ष सुशील कुमार यांनी ३१ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले. सदर प्रकल्पाच्या इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चाला जवळपास २०० कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी १६२ कोटींचा खर्च टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड आणि भागीदार कंपन्या करतील आणि १५ टक्के खच हा शासनाद्वारे अमरावती जिल्हा नियोजनातून उचलण्यात येणार आहे.
दरवर्षी ७ हजार विद्यार्थांना प्रशिक्षण
या प्रकल्पामधून देशातील उद्योगांना कौशल्यांची वाढती गरज पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना भविष्यात जवळच्या उद्योग केंद्रांसाठी तयार करता येईल. केंद्र सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ७,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. हा प्रकल्प अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्यास शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा जागे संदर्भात मान्यता दिली आहे. प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाधारित प्रशिक्षण, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान,अश्या कौशल्येवर्धन प्रशिक्षण मिळणार असून याला टाटा टेक्नॉलॉजी व इतर अग्रगण्य उद्योगांचे सहकार्य लाभणार आहे.जिल्ह्यात तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, आयटीआय, कॉम्पुटर सायन्स सारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणार्‍या शासकीय व खासगी संस्था आहे. त्यांना याचा फायदा होणार आहे.