गोंदिया,
Gondia drug bust तालुक्यातील डांगोर्ली ते किन्ही मार्गाने गांजा वाहतूक करणार्या वाहनावर १ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. आरोपी गोमाजी भागन चौधरी रा. शिवणघाट म.प्र. याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून १ किलो ९९० ग्रॅम गांजासह १ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रावणवाडी पोलिस हद्दीतील डांगोर्ली मार्गाने गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस डांगोर्ली ते किन्ही दरम्यान गस्त घालत असताना आरोपी दुचाकीने संशयीतरित्या जात असल्याचे आढळले. त्याला थांबवून तपासणी केली असता दुचाकीच्या डिक्कीत सेलोटेपले ४० हजार रूपये किमतीचे गुंडाळलेले गांजाचे दोन बंडल आढळले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गांजासह दुचाकी व एक मोबाईल जप्त केला. स्थागुशाचे पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपीवर एन. डी. पी. एस. कायद्याचे कलम ८ (क), २० (ब) दोन(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावणवाडी पोलिस करीत आहे.