गोंदिया,
Indranil Naik ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांंच्यासह आमदार राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.
गोंदियाची धानाचे कोठार म्हणून ओळख आहे. येथील शेतकरी दोन्ही हंगामांत धानाचे उत्पन्न घेतात. खरीपातील धान पीकाची कापणी सुरू असताना गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस मुक्कामाने आहे. 25, 26, 28 ऑक्टोबर व शनिवार 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकाचे होत्याचे नव्हते झाले. शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतात कापणी करून ठेवलेले व उभ्या धान पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. धन शेतातच अंकूरले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून असल्याने धान कूजले आहे. यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही भविष्यात निर्माण होणार आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज रविवारी जिल्ह्याचा विशेष दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी, सालेकसा, गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांना भेट देत तेथील शेतकर्यांच्या बांधावर जावून पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. दौरा आटोपताच नुकसानग्रस्त भागाचा आढावा उपमुख्यमंत्री यांना देणार असून शेतकर्यांना विना विलंब आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकर्यांना दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यातील तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकार्यांना 8 दिवसात पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
चौकट...
गोंदियात पत्र परीषद
पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर गोंदिया येथील शासकीय विश्राम गृह येथे दुपारी पत्र परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनातर्फे शेतकर्यांकडून घेण्यात येत असलेले स्वंयघोषणा पत्र व सदर पत्रात नुकसानग्रस्त भागातील धान विक्री करता येणार नाही असे नमूद असल्याबाबत विचारणा केली असता शेतकर्यांकडून कोणतेही संमतीपत्र अथवा स्वयं घोषणा पत्र घेतले जाणार नसल्याचे सांगून असे कसलेच पत्र न घेता अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचे पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.