वरोडा,
Varoda bus station theft माहेरी वणी येथे जाण्याकरिता निघालेल्या सागरा येथील एका महिलेचे पिशवीमधील 2 लाख 54 हजार रुपयांचे पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरांनी प्रवासादरम्यान लंपास केले. ही घटना रविवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वरोडा बसस्थानकावर उघडकीस आली.

तालुक्यातील सागरा येथील सुचिता हरिराम बांदुरकर ही 40 वर्षीय महिला वणी येथे आपल्या माहेरी जाण्याकरिता निघाली. घरी कुणी नसल्याने तिने घरातील सोन्याचे सर्व दागिने एका डब्यात भरून ते पिशवीमध्ये ठेवले. तसेच घरातील 40 हजार रुपये रोखही त्या पिशवीमध्ये ठेवली. वरोडा शहरात पोहचल्यानंतर तिने आपल्या खात्यातून 10 हजार रुपये रोख काढून त्याच पिशवीच्या एका कप्प्यात ठेवली. त्यानंतर ती वरोडा बसस्थानकावर येऊन वणीला जाणार्या एसटीमध्ये बसली. एसटी सुटावयास वेळ असल्याने तिने आपल्या जवळच्या पिशवीकडे बघितले असता पिशवीची चैन उघडलेली दिसली. चोरीची शंका आल्याने तिने पिशवीमध्ये बघीतले असता त्यात 2 लाख 54 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले डब्बा आढळला नाही. चोरट्याने सोने लंपास केल्याचे लक्षात येताच, तिने आपला प्रवास सोडून वरोडा पोलिस ठाणे गाठले व दागिने चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ वरोडा बस स्थानकावर पोहचून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी केली. मात्र, काही आढळून आले नाही. घटनेचा पुढील तपास वरोडा पोलिस करीत आहे.
पिशवीमधील 50 हजार रोख मात्र सुरक्षित
या महिलेने त्याच पिशवीच्या दुसर्या कप्प्यात घरून आणलेले 40 हजार रुपये व वरोडा शहरात पोहचल्यानंतर आपल्या बँक खात्यातून काढलेले 10 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये रोख ठेवले होते. 2 लाख 54 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरांनी डब्यासह लंपास केले. परंतु, ते 50 हजार रुपये मात्र सुरक्षित राहिले.