रिसोड,
Butter Chariot Festival लोणी हे गाव संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूणित झालेले गाव. लोणी बुद्रुकला प्रती पंढरपूर प्रमाणेच भक्तांची रेलचेल असते. श्री संत सखाराम महाराजांचा १०१ वा रथोत्सव सोहळ्याला २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मोठ्या थाटामाटात सुरुवात होऊन मोठ्या उत्साहात रथोत्सव सोहळा संपन्न झाला. रथ सखाराम महाराजांच्या परिक्रमेला रितीरिवाजा प्रमाणे विधिवत पूजा अर्चा सखाराम महाराज संस्थान चे विश्वस्त डॉ. सखा महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. तद्नंतर दुपारी २ वाजता मंदिरा भोवती रथ परिक्रमेला सुरुवात करण्यात आली. हा रथयात्रेचा उत्सव शके १८४७ इ.स.१९२५ पासून मठाधिपती वै. रामकृष्ण ऊर्फ नाना महाराज पाठक ह्यांच्या कारकीर्दीत सुरू झाला. असून आज त्या रथोत्सवाला तब्बल १०१ वर्षे पूर्ण झाली आहेत. विदर्भ मराठवाड्यातून हजारो भाविक सखाराम महाराजांना बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी रथ ओढून पूर्ण करतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शताब्देतर रथोत्सव सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
रथ परिक्रमा मार्गावर रांगोळी, फुलांची आरास
रथ परिक्रमा मार्गावर सखाराम महाराजांचे निस्सीम भक्त असेलेले जालना येथील कुलकर्णी कुटुंब हे मागील दोन पिढ्यांपासून रथ परिक्रमा मार्गावर सुंदर अशी रांगोळी स्व खर्चातून साकारत असतात. याही वर्षी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. तसेच भक्तगण श्रीनामाचा गजर करून रथावर रेवड्या उधळतात. रथासमोर सजवलेले अश्व अभंगाच्या ठेयावर थिरकत असल्याचा आनंद भक्तांनी घेतला. तसेच टाळमृदंगाचा गजरात बँड पथकेही बोलावण्यात आली होती. महाराजांचा रथातील प्रसन्न मुखवटा भक्तांची अनुरक्ती पाहून आनंदाने जणू हसत असते.