नागपूर,
CSIR-NEERI विज्ञान भारती (विभा) विदर्भ प्रदेश मंडळाच्या सहकार्याने सीएसआयआर- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-नीरी)तर्फे ११ व्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ-२०२५) च्या कर्टन रेजर कार्यक्रमाचे आयोजन नीरी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून आयपीएफटीचे संचालक डॉ. मोहन कृष्णा रेड्डी मुडियम उपस्थित होते.
कार्यक्रमात आयआयएसएफ-२०२५ च्या उद्दिष्टांची रूपरेषा सादर करताना विज्ञान भारतीचे नरेश चाफेकर यांनी विज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आव्हानांचे समाधान आणि ‘भारत-केंद्रित प्रगती’ या संकल्पनेवर भर दिला. आयआयएसएफ-२०२५ पंचकूला–चंदीगड येथे दिनांक ६ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित होत आहे. विभाचे डॉ. प्रकाश इटनकर यांनी महोत्सवातील विविध थीमॅटिक कार्यक्रमांची माहिती दिली, तर डॉ. पनीनी तेलंग यांनी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्टुडंट्स मीटची वैशिष्ट्ये मांडली. डॉ. आर. रामकृष्णन यांनी आयआयएसएफमध्ये प्रदर्शित होणाऱ्या एक हजार हून अधिक विषयांची व्याप्ती स्पष्ट केली, तर डॉ. हेमंत पांडे यांनी ‘द गुरुकुल’ या विज्ञान शिक्षक कार्यशाळेबाबत माहिती दिली.
मुख्य अतिथी डॉ. CSIR-NEERI मोहन मुडियम यांनी ‘लॅब टू लॅंड: शाश्वत कृषीसाठी अॅग्रो-केमिकल्स’ या विषयावर प्रभावी व्याख्यान देत कीटकनाशकांच्या विकासप्रक्रियेचा आढावा घेतला. बायोपेस्टिसाइड्स, प्रिसिजन अॅग्रिकल्चर आणि पर्यावरणपूरक फॉर्म्युलेशन्सची गरज त्यांनी अधोरेखित केली. सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांनी सर्क्युलर इकॉनॉमी या आयआयएसएफच्या प्रमुख थीममध्ये संस्थेच्या सहभागाचा उल्लेख केला. मानव-निर्मित पदार्थांचे वाढते प्रमाण, शहरीकरणाची झपाट्याने वाढ आणि रेखीय अर्थव्यवस्थेतून सर्क्युलर मॉडेलकडे होणाऱ्या संक्रमणाची अनिवार्यता त्यांनी विशद केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक उपलब्ध्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. नागपूर व विदर्भातील सात शाळांमधील ३३२ विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा, हरित संग्रहालय आणि विविध संशोधन विभागांना भेट देत वैज्ञानिकांशी संवाद साधला. शाश्वत विकासासाठी विज्ञाननिष्ठ राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांना सहभागी करण्याचे आवाहनही करण्यात आले.