बंगालच्या उपसागरात संभवतं नवं चक्रीवादळ!

अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Cyclone in the Bay of Bengal बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवामानात तीव्र हालचाल सुरू झाली असून पुढील काही दिवसांत वादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरच्या आसपास आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकून २४ नोव्हेंबरपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात अधिक सक्रिय होऊ शकते. त्यानंतरही ४८ तास हे प्रणाली बळकट होत पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
 

Cyclone in the Bay of Bengal 
स्कायमेट वेदरने देखील याची पुष्टी करत म्हटले आहे की, सध्याच्या समुद्री परिस्थितीमुळे या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ वादळाच्या वेळीही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. नोव्हेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणारी चक्रीवादळे प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मोठा प्रभाव टाकतात. पुढील काही दिवसांत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्ट्यांवर हवामान कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जोरदार पाऊस व वेगवान वारे वाहू शकतात. आयएमडीच्या अंदाजानुसार, १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडूतील अनेक भागांत पाऊस सुरूच राहणार आहे. केरळ आणि माहे येथेही १९ नोव्हेंबर तसेच २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
अंदमान-निकोबार बेटांवरही १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २५ नोव्हेंबर रोजी किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा येथेही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मच्छिमारांसाठी विशेष इशारा जारी केला आहे. १९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्र क्षेत्रात दक्षिण केरळ किनारा, लक्षद्वीप बेटे, मालदीव आणि कोमोरिन परिसरात हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता असून मच्छिमारांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागर, मन्नारचा आखात, पूर्व-मध्य उपसागर तसेच नैऋत्य उपसागरातील विविध भागांमध्येही ठराविक तारखांना समुद्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूणच, बंगालच्या उपसागरातील सक्रियता वाढत असून पुढील काही दिवसांत दक्षिण भारतासह किनारी प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.