गडचिरोलीत स्वतंत्र ‘स्टील क्लस्टर’ उभारण्याचा प्रस्ताव सादर

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Gadchiroli steel cluster proposal गडचिरोलीत हब विकसित करण्यासंबंधी संकल्पना पत्र तयार करण्यात आले आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘गडचिरोलीत स्वतंत्र ‘स्टील क्लस्टर’ उभारण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव सादर केला.
 

Gadchiroli steel cluster proposal, Ashish Kale, Devendra Fadnavis meeting, 
गडचिरोलीत स्टील हबला शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असलेल्या उत्पादन व पूरक उद्योगांचे क्लस्टर म्हणून विकसित करण्याचा मांडण्यात आला आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या लोखंड धातूपासून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, तसेच, संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्यावर या प्रस्तावात विशेष भर देण्यात आला आल्याची माहिती आशिष काळे यांनी दिली आहे.
अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ महोत्सवात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे संचालक बी. प्रभाकरण यांसह उद्योगातील प्रमुखांनी, मोठ्या एकात्मिक स्टील प्रकल्पांना बळकटी देण्यासाठी सेकंडरी स्टील उत्पादकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले होते.
गडचिरोलीत उपलब्ध समृद्ध लोखंड धातू साठे, वाढत्या पायाभूत सुविधा आणि संतुलित प्रादेशिक विकासावर सरकारचा भर या सर्व गोष्टी लक्षात घेता जागतिक दर्जाचे स्टील क्लस्टर उभारण्यासाठी हीच वेळ असल्याचे आशिष काळे यांनी सांगितले आहे. या प्रस्तावाची प्रत उद्योग मंत्री उदय सामंत आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांनादेखील सादर करण्यात आलेली आहे. या पत्रामध्ये प्रि-अक्वायर्ड इंडस्ट्रियल लँड बँक, एमएसएमई व एसएसआयसाठी परवडणार्‍या दरात जमीन उपलब्धता, किमान १ हजार हेक्टर क्षेत्र टप्प्याटप्प्याने विकसित करणे, मजबूत संपर्क, अखंडित वीज व पाणीपुरवठा, स्वतंत्र पॉवर प्रोड्युसरला दीर्घकालीन वाजवी दरात वीज पुरवण्याची सुविधा, लोखंड धातूचा प्राधान्याने पुरवठा, कॉमन फॅसिलिटी सेंटर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक पार्क, तसेच राजधानी अनुदान, वीजदर सवलत, एसजीएसटी रीइम्बर्समेंट, व्याज अनुदान, स्टँप ड्युटी माफी यांसारखे वित्तीय आणि अवित्तीय प्रोत्साहन इत्यादी महत्त्वाच्या गरजादेखील नमूद आल्या आहेत.