गोंदिया,
Gondia burglary gang जिल्ह्यात घरफोडी करून ऐवज लंपास करणार्या टोळ्या सक्रिय झाला आहेत. सुने घर चोरांचे लक्ष ठरत आहेत. शहर व जिल्ह्यात गत काळात अनेक घरफोड्या झाल्या आहेत. यातील काही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. दरम्यान जिल्ह्यात ७ घरफोड्या करणार्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफास केला आहे. टोळीतील ३ आरोपींना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून सोनेचांदीचे दागिने असा ४ लाख ३५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यातील देवरी शहरातील सुरभी चौक येथे योगेश मुनेश्वर यांच्या घरी २६ ऑक्टोबर रोजी चोरी झाली. चोरांनी ४४ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल तसेच शेजारील मनोज गेडाम यांच्या घरातून १० हजार रुपयाचे दागिने, छोटेलाल बिसेन यांच्या कार्यालयातून संगणक साहित्य, शिला बांते यांच्या घरातून १ लाख १२०० रुपयाचे मुद्देमाल पळविला होता.
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार येथे दागिने व रोख, सालेकसा पोलिस ठाण्यातंर्गत महारानीटोला येथे दागिने व रोख, गोंदिया तालुक्यातील कोरणी येथे सोनेचांदीचे दागिने, सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे घरफोडी, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे घरफोडी आदी प्रकरणांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयाच्या आधारावर आरोपी मकबूल जाहूल शाह रा. चांगोटोला जि. बालाघाट, मुस्तफा रज्जाक शाह रा. मालनवाडा जि. शिवनी यांच्यासह इतर एका आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी देवरी, सालेकसा, डुग्गीपार, रावणवाडी येथील ७ प्रकरणात चोरी केल्याचे कबुल केले. आरोपींकडून चोरीतील सोनेचांदीचे दागिने असा ४ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस उपनिरिक्षक वनिता सायकर, रियाज शेख, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पो. हवा. इंद्रजीत बिसेन, सुबोधकुमार बिसेन, प्रकाश गायधने, घनश्याम कुंभरवार, राम खंडारे आदींनी केली.