सहा महिने आयपीएल हवे!

उथप्पाची बीसीसीआयला खुली मागणी

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
IPL is needed for six months माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दोन वेळा आयपीएल विजेता रॉबिन उथप्पा यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या स्वरूपात मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावाची तयारी सुरू असताना उथप्पाने थेटपणे लिलाव पद्धतीच बंद करण्याची सूचना दिली आहे. आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे मिनी लिलाव होणार आहे. मागील वेळच्या मेगा लिलावाच्या तुलनेत यावेळी ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार आहे. परंतु उथप्पा लिलाव प्रणालीच हटवून वर्षभर खुली ट्रेड विंडो आणि ड्राफ्ट सिस्टम लागू करण्याच्या विचारावर ठाम आहेत.
 
 

उथप्पा 
आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे बोलताना उथप्पा म्हणाले, आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे, पण ती अजूनही स्टार्टअप मानसिकतेत अडकून राहिली आहे. ही स्पर्धा आता परिपक्व होण्याची गरज आहे. लिलाव थांबवा, वर्षभर खेळाडूंच्या देवाणघेवाणीची सोय ठेवा आणि ड्राफ्ट पद्धत सुरू करा. मी खेळत असतानाही याच गोष्टी सांगत होतो. त्यांचे मत आहे की आयपीएल फक्त दोन-अडीच महिने न चालता संपूर्ण सहा महिने चालली पाहिजे.
यामुळे चाहत्यांचे अधिक मनोरंजन होईलच, शिवाय या हंगामात आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही समावेश करता येईल. त्यांना वाटतं की लिलाव म्हणजेच टीव्ही मनोरंजन, पण ड्राफ्ट देखील तितकाच लोकप्रिय ठरू शकतो. चाहत्यांना संघांशी जोडून ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे ते पुढे म्हणाले. रॉबिन उथप्पा यांनी आयपीएलमध्ये दीर्घ कारकीर्द घालवली असून २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केल्यापासून त्यांनी एकूण २०५ सामने खेळले आहेत. १३० च्या स्ट्राइक रेटसह त्यांनी ४९५२ धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (२०१४) आणि चेन्नई सुपर किंग्ज (२०२१) सोबत त्यांनी विजेतेपद जिंकले असून २०२२ हंगामानंतर त्यांनी आयपीएलला निरोप दिला.