दिसपूर,
Kaziranga Golden Tabby Tiger भारताच्या जंगलात वाघ त्याच्या खतरनाक शिकारी स्वभावासाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या देखण्या रूपानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तांबूस-पिवळ्या अंगावर उमटणारे काळे ठसठशीत पट्टे हा वाघाचा नैसर्गिक सौंदर्यदर्शक ठेवा मानला जातो. परंतु अलीकडे समोर आलेल्या एका दुर्मीळ वाघाच्या फोटोंनी जगभरातील वन्यजीवप्रेमी मंत्रमुग्ध झाले आहेत.
हा वाघ दिसायला नेहमीच्या पट्टेदार वाघांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. अंगावरील पट्टे अत्यंत फिकट असून शरीरावर एक अनोखा सोनेरी चमकदार पिवळसरपणा दिसतो. हा कोणत्याही वेगळ्या प्रजातीचा वाघ नसून वाघाच्या शरीरातील रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या विशिष्ट जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे त्याचा हा अद्भुत देखावा तयार झाला आहे.
या अद्वितीय रूपामुळे या वाघाला ‘गोल्डन टॅबी’ असं नाव दिलं गेलं आहे. सध्या आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हा अनोखा वाघ पाहायला मिळतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढत आहे. निसर्गाची ही विलक्षण देणगी पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. गोल्डन टॅबीला जगातील सर्वात सुंदर वाघ म्हटले जात असून त्याचे अस्तित्व वन्यजीव जैवविविधतेचे अनोखे उदाहरण मानले जात आहे.