लाडकी बहीण योजनेत नवरा व वडील नसलेल्या महिलांसाठी खास व्यवस्था

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
मुंबई,
mukhyamantri majhi ladaki bahin yojana महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत मिळते. परंतु मागील काही महिन्यांपासून ई-केवायसीसंबंधी अटींमुळे अनेक महिला अडचणीत आल्या होत्या. यामध्ये महिलांना त्यांचा पती किंवा वडील यांच्या आधारकार्डसह ई-केवायसी करणे अनिवार्य ठरले होते. मात्र काही महिलांचा नवरा किंवा वडील नसल्याने त्यांना प्रश्न निर्माण झाला होता की, “आपले पैसे मिळणार आहेत की नाही?” याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. ज्या महिलांचा नवरा किंवा वडील हयात नाही, त्यांच्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहेत.
 

mukhyamantri majhi ladki bahin yojana 
 
यासाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायाद्वारे महिलांना वडील किंवा पतीच्या मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटासंबंधित कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा दिली जाईल. यामुळे महिलांचे पती किंवा वडील हयात नसल्याची माहिती विभागास मिळेल आणि पडताळणी प्रक्रिया सोपी होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. आतापर्यंत १५ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून १६ व्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा सातत्याने लाभ घेत राहावा, अशी सूचना दिली गेली आहे.