नवले पूल अपघात रोखण्यासाठी मुरलीधर मोहोळांनी घेतली गडकरींची भेट

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Nitin Gadkari and Murlidhar Mohol नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे महत्त्व मोहोळ यांनी गडकरी यांच्यासमोर मांडले. या बैठकीत या परिसरातील अपघात थांबवण्यासाठी यापूर्वी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने होणारे अपघात टाळण्यासाठी कोणकोणती पावले उचलता येतील यावर चर्चा झाली. या संदर्भात गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले, असे मोहोळ यांनी सांगितले.
 
 
Nitin Gadkari and Murlidhar Mohol
 
मागील गुरुवारी नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या होत्या. यानंतर मोहोळ यांनी नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधून त्या उपाययोजनांवर चर्चा केली, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील हा अपघात मुंबई–बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ सायंकाळी साधारण ५.४५ वाजता घडला. कंटेनरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सलग वाहनांना जोरदार धडक बसली. या धडकेत आठ ते दहा वाहनं चिरडली गेली तर एका कारला प्रचंड नुकसान झाले आणि आग लागली. अपघातात कारमधील प्रवाशांसह कंटेनर चालक आणि सोबत असलेला क्लिनर यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय २० ते २२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट दिसत आहे. एका कारला ट्रकने जोरदार धडक दिली आणि ती ट्रकच्या समोर अडकून फरफटत पुढे गेली. पुढे जाऊन त्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकीत अडकलेली कार क्षणार्धात पेटली आणि तीनही जळत असलेली वाहने काही अंतर पुढे जाऊन थांबली. दोन्ही ट्रक राजस्थान पासिंगचे असल्याचे समोर आले. अपघातात वाहने इतकी अडकली होती की त्यांना बाजूला करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला. या भीषण घटनेनंतर नवले पूल परिसरात सुरक्षेची उपाययोजना त्वरित करण्याचे आवाहन करण्यात आले असून, केंद्र आणि राज्य प्रशासन या समस्येवर लक्ष देत आहेत.