हैद्राबाद,
Trolling Upasana Konidela दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला तिच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या निशाण्यावर आली आहे. आयआयटी हैदराबादमध्ये तिने तरुण महिलांना एग फ्रीजिंगचा विचार करण्याचा सल्ला दिला आणि ही गोष्ट महिलांसाठी सर्वांत मोठी उपलब्धी असल्याचंही म्हटलं. या वक्तव्यावर अनेकांनी तिला टीका केली, त्यावर उपासनाने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे आणि तथ्य तपासल्याशिवाय तक्रार करणाऱ्यांना फटकारलं आहे.
तिने विचारले की, सामाजिक दबावाला बळी न पडता एखाद्या महिलेनं प्रेमविवाह करणे चुकीचं आहे का? तिला योग्य जोडीदार मिळेपर्यंत प्रतीक्षा करणे चुकीचं आहे का? एखाद्या महिलेनं तिच्या परिस्थितीनुसार मुलं कधी जन्माला घालायची ठरवणे चुकीचं आहे का? लग्न किंवा लवकर मुलं जन्माला घालण्याचा विचार करण्याऐवजी स्वतःचं ध्येय निश्चित करून करिअरवर लक्ष केंद्रित करणं चुकीचं आहे का?
अपोलोमधील आयव्हीएफचा प्रचार करत असल्याच्या आरोपांवर उपासनाने स्पष्ट केलं की, वयाच्या 27 व्या वर्षी तिने लग्न केलं आणि प्रेम व सहवासासाठी हा निर्णय घेतला. वयाच्या 29 व्या वर्षी वैयक्तिक व आरोग्याच्या कारणास्तव एग फ्रीजिंगचा निर्णय घेतला. “मी माझं एग फ्रीजिंग अपोलोमध्ये केले नव्हतं. माझ्या पहिल्या बाळाला वयाच्या 36 व्या वर्षी जन्म दिला, आणि आता वयाच्या 39 व्या वर्षी मी जुळ्या मुलांची आई होणार आहे,” असे तिने सांगितले.
उपासनाने या पोस्टच्या शेवटी म्हटलं की, “माझ्या प्रवासात मी माझं करिअर आणि वैवाहिक आयुष्य दोन्हींना महत्त्व दिलं आहे. कुटुंब वाढवण्यासाठी आनंदी आणि स्थिर वातावरण आवश्यक आहे. माझ्यासाठी लग्न आणि करिअर हे प्रतिस्पर्धी नाहीत. मी वेळ स्वतः निश्चित करते. हा माझा अधिकार आहे.” तिने महिलांना सांगितलं की, “महिलांसाठी सर्वांत मोठा विमा म्हणजे एग फ्रीजिंग. त्यामुळे तुम्ही लग्न कधी करायचं, स्वतःच्या अटींवर मुलं कधी जन्माला घालायची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कधी व्हायचं हे निवडू शकता. सर्व निवडी तुमच्या हाती असतात.”