समुद्रपूर,
cci-cotton-purchase : तालुक्यातील खापरी (धोंडगाव) येथील एमजेआर अॅग्रोटेकमध्ये सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू झाली आहे. तसेच शुक्रवार २१ रोजी पासून जाम येथील सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज व उबदा येथील प्रकाश व्हाइट गोल्डमध्ये सीसीआयमार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती हिंमत चतूर यांच्या हस्ते होणार आहे.

शेतकर्यांनी आपली ऑनलाइन कापूस नोंदणी पीक पेरा असलेला डिजिटल सातबारा, पीडीएफ करून फोटो, आधार कार्ड डाउनलोड करावे. कापूस किसान गुगल प्ले स्टोअर मोबाइल अॅपद्वारे स्वतःच्या आधार लिंक मोबाइलद्वारे करून घ्यावी. कोणत्याही केंद्रावर गर्दी आणि लांब रांगा टाळण्यासाठी सीसीआय नोंदणीकृत शेतकर्यांसाठी कपास किसान मोबाइल अॅपद्वारे स्लॉट बुकिंग सुविधा सुरू केली. या अॅपद्वारे शेतकरी ७ दिवसांच्या अंतराने स्लॉट बूक करू शकतात आणि स्लॉटच्या उपलब्धतेनुसार त्यांची पसंतीची विक्री तारीख निवडू शकणार आहे. स्लॉट बुकिंगनंतर किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत केवळ नोंदणीकृत शेतकरीच त्यांचा कापूस सीसीआयला विकण्यास पात्र असेल. नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. शेतकर्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समिती सभापती हिंमत चतुर, उपसभापती वामन चंदनखेडे, जिनिंगचे संचालक मंडळ तसेच सचिव शंकर धोटे यांनी केले आहे.