ढाका,
6 dead in Bangladesh earthquake बांगलादेशमध्ये बुधवारी सकाळी आलेल्या जोरदार भूकंपाने भीषण हाहाकार माजवला. सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी आलेल्या 5.7 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ढाक्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील नरसिंगडीच्या माधाबादी परिसरात भूकंपाचे केंद्र असल्यामुळे राजधानीसह अनेक जिल्ह्यांमध्ये या धक्क्यांची तीव्रता जाणवली. काही सेकंदांतच इमारती हलू लागल्या आणि लोक घाबरून घराबाहेर पळत सुटले. ढाक्यातील एका दहा मजली इमारतीचा पाया हलून ती एका बाजूला झुकली. परिस्थिती गंभीर असल्यामुळे सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तात्काळ थांबविण्यात आला. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन मृतांची अधिकृत पुष्टी केली आहे.

गाझीपूर जिल्ह्यातील श्रीपूर येथे भूकंपादरम्यान मोठी दुर्घटना घडली. डेनिमेक या कापड कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी कामगारांनी गोंधळात धावाधाव केली आणि झालेल्या चेंगराचेंगरीत 150 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले. भूकंप झाल्यानंतर कारखान्याचे मुख्य गेट उघडण्यास व्यवस्थापनाने नकार दिल्याचा आरोप कामगारांनी केला असून, त्यामुळेच घबराट वाढली आणि जखमींची संख्या अधिक झाली. सर्व जखमींना श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. नारायणगंजच्या रूपगंज उपजिल्हा विभागात तर भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पळालेल्या एका महिलेवर दुर्दैव कोसळले. तिच्यासोबत धावत असलेल्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर रस्त्याकडेला असलेली भिंत कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. मुलाची आई आणि एक शेजारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या मृत्यूची पुष्टी करताना हा प्रकार अतिशय वेदनादायक असल्याचे सांगितले. भूकंपानंतर त्याचे धक्के भारतातही जाणवले. कोलकात्यासह कूचबिहार, मालदा, दक्षिण दिनाजपूर आणि नादिया जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 सेकंद हलक्या ते मध्यम तीव्रतेचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.2 नोंदली गेली. कोलकात्यात कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान न झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 1762 मध्ये आलेल्या 8.5 तीव्रतेच्या ‘ग्रेट अराकान’ भूकंपानंतर बांगलादेशातील हा सर्वात भीषण भूकंप मानला जात असून, बचाव पथकांकडून ढाक्यासह अनेक ठिकाणांवर शोध आणि मदतकार्य सुरू आहे.