गडचिरोली,
Leopard attack in Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यजनावराच्या दहशतीची भीषण घटना घडली असून देऊळगाव बुट्टी (आरमोरी) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या या दोन्ही महिलांवर गेल्या काही दिवसांत स्वतंत्रपणे हल्ला झाला. दोन्हींचा मृतदेह जंगलालगत सापडताच गावकरी हादरून गेले आहेत.
मृत महिलांची नावे मुक्ताबाई नेवारे (वय ७०) आणि अनुसया जिंदर वाघ (वय ८०) अशी आहेत. मुक्ताबाई नेवारे या १९ नोव्हेंबरच्या सकाळच्या सुमारास गावापासून जवळच्या जंगलात सरपण गोळा करत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत त्यांना ठार केले. तर अनुसया वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून सतत जंगलात फिरत होते. अखेर गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडाजवळ मृत प्राण्यांचा उग्र वास येऊ लागल्यानंतर गावकऱ्यांनी शोधमोहीम तीव्र केली आणि रात्री आठच्या सुमारास त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
दोन्ही मृतदेह परिसरात जवळच मिळाल्याने हे दोन्ही हल्ले एकाच बिबट्याने केल्याचा संशय अधिक घट्ट झाला आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी दोन्ही मृतदेह पाठविण्यात आले असून आरमोरी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ–दहा दिवसांपासून देऊळगाव परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत होता. काही घरांतील कोंबड्यांवरही त्याने हल्ले केले होते, मात्र वनविभागाला याबाबत सूचना दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दुहेरी हल्ल्यांनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून त्यांनी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली आहे.