नागपूर,
Metro Station Feeder Bus : महा-मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा येथून खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत फीडर बस सेवा सुरुवात करण्यात आली. या नव्या सेवेचा मोठा लाभ रुग्णांच्या नातेवाईक तसेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि स्टाफ आदींना होणार आहे.
महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा अतिरिक्त वासुमना पंत, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, महा-मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून फिडर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांच्या कर्मचार्याकरता शहरातून बस सेवाचा वापर करण्यात यायचा तो आता बंद होणार आहे. आता खर्या मेट्रो ते डेस्टिनेशन अश्या लास्ट माईल कनेक्टिव्हीटी प्रदान करण्यात आली आहे.
खापरी मेट्रो स्टेशनच्या जवळच आयटी पार्क, मिहान,एम्स,आयआयएम अनेक महत्त्वपूर्ण संस्था व शासकीय कार्यालये आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू झालेली फीडर बस सेवा खापरी स्टेशन ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ, सुरक्षित झाली आहे. फर्स्ट आणि माईल कनेक्टिव्हिटीमधील अडचणी दूर करून प्रवासी संख्या वाढवणे, शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागपुरातील सार्वजनिक मजबूत करणे हा महा-मेट्रोचा उद्देश असल्याचे या वेळी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. फीडर बस सेवा सुरू झाल्यामुळे रुग्णसेवा, कर्मचारी प्रवास तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
एनसीआयची वास्तू, संस्था आणि रुग्णालयाचा दर्जा हा अपेक्षेपेक्षा अनेक पट अधिक उत्कृष्ट असून त्याचबरोबर सेवाभाव आणि संवेदनशीलता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात असल्याची माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली.