*78 नगराध्यक्ष, 1 हजार 275 सदस्यपदाच्या उमेदवारांमध्ये लढत
*नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक
दिनांक :21-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर,
nagar-panchayat-elections जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोडा, ब्रम्हपूरी, मूल, राजुरा, घुग्घूस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या 10 नगर परिषद व भिसी नगरपंचायतीची निवडणूक 2 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीसाठी नगराध्यक्षदाचे 78 व नगरसेवकपदाचे 1 हजार 275 असे एकूण 1 हजार 353 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.
नगरपरिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरवात झाली. 17 नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या दिवसात नगराध्यक्षपदासाठी एकूण 121, तर नगरसेवकपदाकरिता एकूण 1 हजार 545 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. उल्लेखनीय म्हणजे, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले नामांकन अर्ज दाखल केले.
18 नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. nagar-panchayat-elections या दिवशी चंद्रपुरात नगराध्यक्षपदासाठी एकूण 91, तर नगरसेवकपदासाठी 1 हजार 347 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. छाननीत नगराध्यक्षपदाचे 30, तर नगसेवकपदाचे 200 नामांकन अर्ज बाद झाले होते. दरम्यान, नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी 10 नगरपरिषद व 1 नगरपंचायतमधून एकूण 84 उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले असून, 1 हजार 353 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे.