आत्महत्या प्रकरण : नातेवाईकांचा रास्तारोको

अग्नीशमनच्या तिघांवार गुन्हे दाखल

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
suicide-case-amravati मनपाच्या अग्नीशमन दलातील फायरमन व सद्या एमआयडीसी केंद्र, बडनेरा येथील अग्नीशमन दलाचे केंद्रप्रमुख राजेश वासुदेवराव मोहन (५०) यांनी गुरूवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व एका व्हिडीओमध्ये मनपा अग्नीशमन दलाचे दोन अधिकारी व अन्य एक अशा तिघांच्या मानसिक त्रासामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी शुक्रवारी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. मात्र, त्यांना पोलिसांनी अटक न केल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेले मोहन यांचे नातेवाईक व निकटवर्तीयांनी डॉ. आंबेडकर चौकात रास्तारोको करुन गुन्हे दाखल झालेल्यांना तत्काळ अटक करा, तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.
 
 
suicide-case-amravati
 
राजेश मोहन यांचा मृत्यूपूर्व व्हिडीओ व त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन बडनेरा पोलिसांनी अग्नीशमन अधिक्षक संतोष केन्द्रे, मुख्य अग्नीशामक अधिकारी लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदे या तिघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तक्रारीनुसार, मोहन यांना या तिघांनीही प्रचंड मानसिक त्रास त्रास दिला तसेच मोहन हे कुटूंबियांसह राहत असलेले क्वार्टर केन्द्रे यांनी खाली करुन द्या असे म्हटले होते. suicide-case-amravati विभागातील सोसायटी बंद केली. तसेच मोहन यांनी पगाराच्या बेसिक संबधी आकृतीबंद आराखड्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यावरुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जात असे, तसेच त्यांना कामावरुन निलंबित सुध्दा करण्यात आले होते. पावडे हे केन्द्रेंच्या सूचनेवरुन मोहन यांना मानसिक त्रास देत होते. मोहन यांनी केन्द्रे व पावडे यांना फोन करुन विनंतीसुध्दा केली होती कि, मला मानसिक त्रास देणे बंद करा, तसेच रामकृष्ण शिंदे हा पैसे परत करण्यासाठी तगादा लावत होता, असा उल्लेख पोलिस तक्रारीत करण्यात आला आहे. राजेश मोहन यांनी गुरुवारी बडनेरा अग्नीशमन दलाच्या कार्यालयात जावून विष घेतले. त्यांनी विष घेतल्याची माहीती मिळताच त्यांना तत्काळ इर्विन रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच गुरूवारी सायंकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शुक्रवारी आंदोलना दरम्यान पोलिसांनी नातेवाईकांसोबत चर्चा करुन तिघांच्या अटकेसाठी आम्ही पथक रवाना करतो आहे, असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे नातेवाईकांनी रस्त्यावरुन उठण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपींना प्रत्यक्ष अटक होईस्तोवर शवविच्छेदन करण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले.