जालना,
Suicide of female students in Jalna जालना शहरात एक अत्यंत वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. सीटीएमके गुजराती विद्यालयात शिकणारी १३ वर्षीय आरोही दीपक बिटलान हिने शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारत आयुष्य संपवले. आठवीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आरोहीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नसली तरी, तिच्या पालकांनी शाळेतील काही शिक्षकांवर गंभीर आरोप करत हा मृत्यू छळामुळे झाल्याचा दावा केला आहे. शिक्षकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळूनच मुलीने असे टोकाचे पाऊल उचलल्याचा त्यांचा आरोप असून, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ पुढील प्रक्रिया सुरू केली. पोलिस अधिकारी संदीप भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामार्फत घटनेची माहिती मिळाल्यानंतर एडीआर म्हणजेच अपघाती मृत्यू अहवाल नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तीन विशेष पोलिस पथके गठीत करण्यात आली असून, कुटुंबीयांचे बयान नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करत तपास पथके सत्य परिस्थिती उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दुर्दैवी घटनेने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गात चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.