वणी,
Vani Municipal Council Elections : वणी नप सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. आज 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यात प्रभाग 4 मधून सर्वाधिक 3 अर्ज मागे घेण्यात आले तर प्रभाग क्रमांक 9 ब मधून दोघांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या एका उमेदवारांनी देखील अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 150 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
प्रभाग 4 अ येथून माधुरी किरण तेलतुंबडे, प्रभाग 4 ब येथून अनिल नानाजी ताजणे व धीरज गणेश भोयर यांनी आज उमेदवारी मागे घेतली. प्रभाग 8 ब येथून निखिल प्रभाकर डवरे, प्रभाग 9 ब येथून भारत शंकर कुमरे व सतिष नामदेव इचवे यांनी उमेदवारी मागे घेतली. तर प्रभाग 14 अ येथून वंदना महेश पारखी यांनी उमेदवारी मागे घेतली. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार उमा विठ्ठल राजगडकर यांनी देखील उमेदवारी मागे घेतली.
26 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रकाशित केली जाणार असून याच दिवशी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह मिळताच अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. 26 नंतरच प्रचाराची खरी रंगत दिसणार आहे.