भारताला १८ वर्षानंतर सुवर्ण पदक;
ढाका येथे झाल्या आशियन स्पर्धा
दिनांक :21-Nov-2025
Total Views |
अमरावती,
yashdeep-bhoge बांग्लादेशातील ढाका येथे पार पडलेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करत अमरावतीचा सुपुत्र यशदीप संजय भोगे यांनी सुवर्णपदकाची चमक दाखवत देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तब्बल १८ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत मिळालेले हे ऐतिहासिक सुवर्णपदक अमरावतीसह संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण ठरले आहे. यशदीप भोगे यांनी अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत करून भारतीय तिरंदाजीचे सामर्थ्य पुन्हा सिद्ध केले.
उत्कट एकाग्रता, अचूक लक्ष्य आणि दमदार मानसिकता यांच्या जोरावर यशदीप यांनी मिळवलेले हे सुवर्णपदक भारतीय तिरंदाजीसाठी नवे पर्व ठरले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनित राणा यांनी अमरावती येथील गंगा सावित्री निवासस्थानी यशदीप भोगे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी यशदीपच्या जिद्दीचे, कठोर परिश्रमांचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उज्ज्वल कामगिरीचे कौतुक केले. yashdeep-bhoge यशदीप भोगे यांच्या मागील कठोर प्रशिक्षणासाठी जबाबदार असलेल्या प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांचे सुद्धा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रदेशातील युवकांसाठी यशदीप भोगे हे प्रेरणादायी आदर्श ठरत असून तिरंदाजीसह इतर खेळांमध्येही अधिक तरुणांना संधी देण्यासाठी ही मोठी प्रेरणा ठरणार आहे. याप्रसंगी अॅड. प्रशांत देशपांडे, कमलकिशोर मालानी, सचिन भेंडे, अॅड. दीप मिश्रा आदीउपस्थित होते.