अफगाणिस्तानचे भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीस आमंत्रण

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Afghanistan invites Indian companies अफगाणिस्तानचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री अलहाज नूरुद्दीन अझीजी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी भारतीय कंपन्यांना अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले आणि द्विपक्षीय व्यापार तसेच आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
 
 
Afghanistan invites Indian companies
 
मंत्री अझीजी यांनी खाणकाम, कृषी, आरोग्य आणि औषध, आयटी, ऊर्जा आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांमध्ये व्यवसाय भागीदारीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी अफगाणिस्तानच्या हिंदू आणि शीख समुदायाच्या अधिक सहभागाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आणि सर्व भागधारकांसाठी समावेशक, शांततापूर्ण आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी देशाच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
 
 
अझीजी यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या आयोजित संवाद सत्रातही भारत सरकारच्या सततच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तान कच्च्या मालावर आणि यंत्रसामग्रीवर एक टक्का शुल्क, मोफत जमीन वाटप, विश्वासार्ह वीज पुरवठा तसेच नवीन व्यवसायांसाठी प्रस्तावित पाच वर्षांची कर सूट यासारखी अनेक प्रोत्साहने देत आहे. अफगाणिस्तानमधील या अनुकूल धोरणांचा उद्देश स्थानिक हिंदू-शीख बांधवांना देशात परत येण्यास आणि व्यवसायिक व आर्थिक क्रियाकलापात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. भारत आणि अफगाणिस्तानने द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी अनेक उपायांवर सहमती दर्शविली असून, सध्या हा व्यापार अंदाजे १ अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे. याबरोबरच, भारत आणि अफगाणिस्तानमधील हवाई मालवाहू सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.