प्रफुल्ल व्यास
वर्धा,
wardha seats vacant एकेकाळी जिल्ह्यात स्वतःचे राजकीय वर्चस्व निर्माण करणारी, स्थानिक नेतृत्वाचा दबदबा असलेली आणि उमेदवारांची रांग असणार्या काँग्रेसला उमेदवार मिळविण्यासाठी जुळवा-जुळव करावी लागते. स्वबळाची ताकदही काँग्रेस नेत्यांमध्ये राहिलेली नाही. नगराध्यक्ष पदासाठी ६ पैकी तब्बल ५ ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपदाकरिता कसाबसा उमेदवार मिळाला. जिल्ह्यातील १६६ जागांपैकी ६५ जागांवर नगरसेवकाचेही उमेदवार काँग्रेसला देता आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडे दमदार नेत्यांसह उमेदवार आणि जनाधारही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा आलेख दर निवडणुकीत खाली येत असल्याचे दिसुन येते.
ज्या पदासाठी एकेकाळी काँग्रेसमध्ये जबरदस्त चढाओढ असायची. आज मात्र काँग्रेसला उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. काँग्रेसचे नेते व माजी नगराध्यक्ष डॉ. चंद्रशेखर खडसे यांच्या चिरंजिवाने नगरसेवकपदासाठी तयारी केली तर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही, अशी परिस्थिनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी असल्याचे फिरता फिरता लक्षात आले.
वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या र्हासाला सुरुवात झाली ती प्रभा राव आणि प्रमोद शेंडे यांच्या निधनानंतर! या दोन नेत्यांनंतर एका शब्दावर पदाधिकारी एकत्र येतील अशी ताकद असलेला नेताच शिल्लक राहिला नाही. माजी मंत्री रणजित कांबळे यांनी काँग्रेस स्वत: भोवती गुंडाळण्याचा प्रयोग केला. त्यात ते यशस्वी झाले पण काँग्रेस प्रत्येक ठिकाणी अपयशीच ठरत आहे. अगदी गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात लोकसभेचा उमेदवार काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे काँग्रेसमध्येच राहून आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची जागा लढवली आणि येथील परंपरागत काँग्रेसचा लोकसभा मतदार संघ पवार गटाच्या दावणीला बांधल्या गेला. जिल्ह्यातील चार पैकी तीन विधानसभा मतदार संघ ताब्यात ठेवणार्या काँग्रेसकडे आज एकही आमदार नाही. काळे परिवाराचे वर्चस्व असलेल्या आर्वी नगर पालिकेत २५ पैकी ५ सदस्य व १ नगराध्यक्षपदावर काँग्रेसला समाधान मानावे लागले. येथे तर एबी फॉर्मही ठरवलेल्या उमेदवारांना देण्यात आले नसल्याचा आरोप होतो आहे. जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांमधील परिस्थिती काहीशी अशीच आहे. हिंगणघाट येथे नगराध्यक्षची जागा काँग्रेसने शरद पवार गटासाठी सोडली. येथे ४० पैकी १३ ठिकाणीच नगसेवकपदाचे उमेदवार उभे केले. वर्धा नगर पालिकेत ४० पैकी २३, पुलगाव येथे २१ पैकी १८ उमेदवार उभे केले आहेत. देवळी येथे २० पैकी २० नगरसेवक उभे केले तर सिंदीरेल्वे येथेही २० पैकी २० उमेदवार लढत आहेत. काँग्रेसपेक्षा उबाठा आणि शरद पवार गटाची स्थिती मजबूत झाली आहे.wardha seats vacant उबाठाने जिल्ह्यात नगरसेवकाचे १०१ तर वर्धा, हिंगणघाट, पुलगाव व सिंदी रेल्वे येथे नगराध्यक्षसाठी उमेदवार उभे केले. वर्धेचे सहकार महर्षी सुरेश देशमुख आणि त्यांचे चिरंजिव समीर यांना सळो की पळो करून सोडणारे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल वांदिले यांनी १०७ ठिकाणी नगरसेवक तर हिंगणघाट, सिंदीरेल्वे येथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले. या प्रक्रियेत काँग्रेसची स्थिती आत्मविश्वास नसलेला पक्ष अशी झाली आहे. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या अधोगतीची सुरुवात वर्धेतून व्हावी, हे दुर्देवच म्हणावे लागेल. काँग्रेसला आधार देणारा नेताच जिल्ह्यात शिल्लक राहिलेला नाही. प्रभा राव विरुद्ध प्रमोद शेंडे हे राजकारण वर्धेकरांना ठाऊक आहे. तोच कित्ता शेखर शेंडे विरुद्ध रणजित कांबळे (प्रभा राव यांचे भाचे) गिरवत आहेत. आईचा राजकीय वारसा स्वत:कडे खेचण्यासाठी प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस यांनी प्रचंड प्रयत्न केलेे. परंतु, त्यांना कांबळे यांनी ‘माहेर’च पोरके केले. आता काँग्रेसकडे ना लोकसभा, ना विधानसभा, आता ना नगर पालिका... काय होतास तू काय झालास तू असेच काहीसे झाले आहे.