ताडोबातून नवेगाव-नागझिर्‍यात चितळ स्थानांतरित

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर, 
tadoba : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून चितळांचे स्थानांतर करण्याच्या उपक्रमाची यशस्वी सुरुवात शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 10 चितळांचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे स्थानांतर करण्यात आले.
 
 
 
J
 
 
 
ताडोबामध्ये चितळांना पकडून आफ्रिकन पद्धतीच्या ‘बोमा’ संरचनेत ठेवण्यात आले. ही बोमा संरचना कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणीच्या विस्तीर्ण माळरानात उभारण्यात आली आहे. जामणी परिसरातील समृद्ध चितळसंख्या आणि अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे बोमा उभारण्यासाठी हा सर्वात योग्य परिसर ठरला. या उपक्रमाची तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू होती.
 
 
बोमातून चितळांना विशेष तयार केलेल्या स्थानांतर वाहनांद्वारे हलविण्यात आले. या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फॉगर तसेच जखम टाळण्यासाठी आवश्यक कुशनिंगची सोय आहे. तसेच नर-मादी चितळांना वेगळे ठेवता येईल, अशी यात रचना करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी अशी दोन वाहने विशेष खरेदी करून सुधारित करण्यात आली. चितळांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील ‘सॉफ्ट-रिलीज एनक्लोजर्स’मध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत एकाही चितळाचा मृत्यू न होणे हे सर्वात मोठे यश आहे, असे आनंद रेड्डी यांनी सांगितले.
 
 
 
उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे कार्य केले. त्यांना सहायक वनसंरक्षक विवेक नातू यांचे सहकार्य लाभले. सहायक वनसंरक्षक अनिरुद्ध धागे, वन परिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, विशाल वैद्य यांनीही यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या स्थानांतर प्रक्रियेसाठी मध्य प्रदेशातील तज्ज्ञ पथकातील वन वरिक्षेत्र अधिकारी डॉ. बलवंत केशवाल, डेप्युटी आरओ चौधरी, उईके आणि भायस यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन परिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाहतूक आणि पायलटिंगदरम्यान आवश्यक सहकार्य केले.
 
चितळाचे स्थानांतरण महत्त्वाचा टप्पाः प्रभू नाथ शुक्ला
 
 
या स्थानांतर उपक्रमामुळे ताडोबाचा शाकाहारी प्राण्यांच्या स्थानांतराचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. यापूर्वी नवेगाव-नागझिरा, सिमलीपाल आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. आता चितळांचे यशस्वी स्थानांतर हा ताडोबाच्या संवर्धन कार्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले.
 
भविष्यातही असे उपक्रम राबवले जाईलः रेड्डी
 
 
संवर्धनातील विविध आव्हाने आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या पृष्ठभूमीवर अशा सक्रिय व्यवस्थापन उपाययोजना अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्र वन विभाग भविष्यातही अशा प्रगतिशील उपक्रमांची अंमलबजावणी करीत राहील, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांनी सांगितले.