बारामती,
Eight candidates unopposed in Baramati बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) महत्त्वाची आघाडी घेतली आहे. एकूण ४१ जागांपैकी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात सात उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला, तर छाननी प्रक्रियेदरम्यान एक उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच अजित पवार याना आठ जागांवर विजय मिळाल्याने बारामतीतील राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
पहिल्या टप्प्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे बारामतीत मतदानापूर्वीच गुलाल उधळलेल्याचे चित्र दिसून येते. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये किशोर मासाळ, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, अश्विनी सातव आणि आफ्रिन बागवान यांचा समावेश आहे. यापैकी अनुप्रिता डांगे यांचा बिनविरोध विजय छाननीच्या टप्प्यातच ठरला होता, तर उर्वरित सात उमेदवारांनी कोणतीही स्पर्धा न राहिल्याने सहज विजय मिळवला.
पक्षातील कार्यकर्त्यांचे मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या रणनीतीचे हे यश आहे. विरोधकांनी काही प्रभागांमध्ये उमेदवारी मागे घेतली किंवा अर्ज अपात्र ठरवला, ज्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सरळ विजय मिळाला. आगामी निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने हा विजय पक्षासाठी मोठं मनोबल वाढवणारा ठरला आहे. बारामती नगरपरिषद निवडणूक नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या या यशामुळे बारामतीतील राजकारणाची दिशा दिसून येते. उर्वरित ३३ जागांवर आता मुख्य लढत रंगणार असून, आगामी दिवसांत प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार खरी लढत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन सदाशिव सातव तर शरद पवार यांच्या गटातून बळवंत बेलदार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. याशिवाय भाजपाचे गोविंद देवकाते, बसपाचे काळूराम चौधरी आणि अपक्ष शुभम मोरे हेही रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील थेट भिडत ही या लढतीचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. भाजपाचा उमेदवार शहरी मतदारांमध्ये पकड वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर बसपचे चौधरी आणि अपक्ष मोरे स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांमुळे बारामतीतील मतदानाची दिशा कोणाकडे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र खरी लढत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्येच असेल.