गोंदिया,
campaigning-election : जिल्ह्यातील २ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील अर्ज माघारी नंतर उमेदवारांची निश्चिती झाली आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराला आता वेग आल्याचे चित्र आहे. चारही ठिकाणातील निवडणुकीत अनेक नवे चेहरे असल्याने अजेंडा काय असेल, याची उत्सुकता त्यांच्या प्रभागातील मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तर सालेकसा व गोरेगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ४ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यपदासाठी ४४ तर नगरसेवक पदासाठी ७०० नामांकन अर्ज दाखल झाले होते. सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतीत छानणीनंतर ४३ अर्ज तर गोंदियात नगराध्यक्षपदाचे १०, नगरसेवकपदाचे १२३, तिरोडा येथे नगरसेवकपदाचे १८ नामांकन अर्ज बाद झाले. पैकी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसी नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांनी तर नगरसेवकपदाच्या ५० उमेदवारांनी त्यांचे नामांकन मागे घेतले. आता ४ नगराध्यक्ष पदासाठी २७ व ९८ नगरसेवकांच्या पदासाठी ४३८ उमेदवार किल्ला लढवत आहेत.
माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्प्ष्ट झाले आहे. काही ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्याला ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धांदल उडाली होती. मात्र, ज्यांचे उमेदवार निश्चित होते, अशांच्या प्रचाराला आधीपासूनच प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख होती. राजकीय वातावरणात उलथापालथ झाल्यानंतर शुक्रवारी बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेत अनेकांचे निवडणुकीचे मार्ग मोकळे करून दिले आहेत. एकंदरीत आता मतदार राजाला अनुकूल करून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचाराचे रान उठविणार आहेत. काही प्रभागात यंदा वेगळे चेहरे दिसणार आहेत, त्यामुळे अशा उमेदवारांच्या विजयाच्या दृष्टीने त्यांच्यासमोर मोठेच आव्हान उभे आहे.
आता आठ दिवसच प्रचाराला
माघारीनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात अधिकृत प्रचाराला सुरुवात केली आहे. अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होणार असल्याने यानंतरच त्यांच्या प्रचाराला प्रारंभ होईल. निवडणुकीतील उमेदवारांना आता जाहीर प्रचार करण्यासाठी जेमतेम आठ दिवसच मिळणार आहेत. त्यामुळे या कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करणार, हे नक्की.