माहुली जहागीरच्या सरपंचांना ‘सर्वोच्च’ दिलासा

-प्रीती बुंदीले सरपंचपदी राहणार कायम -उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
नांदगाव पेठ, 
sarpanch of mahuli jahagir माहुली जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती बुंदीले यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा आणि निर्णायक दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीत निर्माण झालेल्या अनिश्चिततेला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम देत त्यांना सरपंच पदावर पुन्हा सर्व अधिकारांसह कायम राहण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
 

mahuli jahagir 
 
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लाच प्रकरणात ४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रीती बुंदीले यांना अपात्र ठरवणारा आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान त्यांच्या बाजूने अ‍ॅड. निलेश गावंडे यांनी सखोल आणि ठोस कायदेशीर युक्तिवाद सादर करत उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्याची मागणी केली. या युक्तिवादाला मंजुरी देत न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित ठेवत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. या निर्णयामुळे प्रीती बुंदीले यांचे सरपंच पद अबाधित राहणार असून ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण प्रशासनीक कारभार पूर्ववत सुरू राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अशांतता व अफवांनाही या निकालाने पूर्णविराम मिळाला आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करत न्यायालयाने योग्य हस्तक्षेप करून न्याय दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.sarpanch of mahuli jahagir सरपंचपदावरील स्थिरतेमुळे ग्रामविकासाची कामे नव्या जोमाने गतिमान होतील, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला असून खा. डॉ. अनिल बोंडे, आ. राजेश वानखडे,आ. रवी राणा, भाजप नेत्या नवनीत राणा,विवेक गुल्हाने यांनीही या निर्णयाचे स्वागत करत प्रीती बुंदीले यांना शुभेच्छा दिल्यात.
सत्याचा खर्‍या अर्थाने विजय
सत्याचा आता खर्‍या अर्थाने विजय झाला आहे. ग्रामस्थांच्या विश्वासानेच मला शक्ती दिली. हा निर्णय ग्रामविकासाच्या कामांना नवा वेग देईल.
-प्रीती बुंदीले
सरपंच, माहुली जहागीर