पंजाब किंग्जची वाढली चिंता!श्रेयस अय्यर काय होणार?

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Punjab Kings' growing concerns भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या फिटनेसबाबत नवी माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कॅच घेताना झालेल्या गंभीर दुखापतीनंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारानंतर तो भारतात परतला असून सध्या मुंबईतील घरी रिहॅब प्रक्रियेत आहे.
 
shreyas iyer
 
श्रेयसला अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्येही दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली असली तरी डॉक्टरांनी त्याला अजून किमान एक महिना पूर्ण विश्रांती घ्यावी असा सल्ला दिला आहे. कोणत्याही प्रकारची जोराची हालचाल, वजन उचलणे किंवा पोटावर दबाव येईल असा व्यायाम करण्यास त्याला मनाई करण्यात आली आहे. सध्या तो केवळ हलक्या व्यायामावर भर देत आहे. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या पुढील अल्ट्रासोनोग्राफीच्या अहवालावरून तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब सुरू करू शकेल की नाही, हे निश्चित होणार आहे.श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसह जानेवारीतील न्यूझीलंड मालिकेलाही मुकणार आहे.
त्याचा हा पुनर्वसन काळ वाढल्याने पंजाब किंग्जचीही चिंता वाढली आहे. IPL 2026 हंगामाच्या सुरुवातीस तो उपलब्ध राहील की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अलिकडच्या रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना तरी तो मुकू शकतो. काही दिवसांपूर्वीच श्रेयसला पंजाब किंग्जच्या सहमालकीण प्रीती झिंटासोबत पाहण्यात आले होते, ज्यामध्ये आयपीएल आणि त्याच्या फिटनेसवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. श्रेयसची स्थिती सुधारत असली तरी त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी अजून काही महिने लागणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारतीय संघ आणि पंजाब किंग्ज दोघांसमोरही आगामी महिन्यांत योग्य पर्याय शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.