रेसिंग बाईकच्या नावाखाली काेट्यवधीने फसवणूक

- एम.एच. माेटर्सच्या मालकाने ग्राहकांना गंडवले - पाेलिसांनी गाेठवले आराेपींचे बँक खाते

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
racing-bike-fraud : शहरातील एमएच माेटर्सने 50 ते 100 नागरिकांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. स्वस्त दरात आणि व्याजदर न आकारता कर्ज उपलब्ध करुन रेसिंग बाईक मिळवून देण्याचे आमिष दाखवून लकडगंज येथील एम.एच माेटर्सने शेकडाे ग्राहकांची काेट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती समाेर आली. या प्रकरणी 13 ग्राहकांच्या तक्रारीवरुन लकडगंज पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, इरान हारून बंदूकिया (46, रा. मस्कासाथ, इतवारी) यांना रेसिंग गाडी घ्यायची हाेती. त्यांनी मित्राच्या माध्यमातून एम.एच माेटर्स गाठले. आराेपी फिराेज हमीद खान पठाण (35), वहीद आलम आणि माे. सराराज माे. शकील (25) यांनी 1 ऑक्टाेबर 2023 ते 10 ऑक्टाेबर 2025 या कालावधीत इरान यांना स्वस्त दरात गाडी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आराेपींनी इरान यांना डाऊन पेमेंट करण्यास सांगितले. त्यांनी 3 जानेवारी 2025 राेजी स्कॅनरद्वारे 50 हजार रुपये पाठवले आणि गाडी घेताना राेख 50 हजार रुपये दिले.
 
 
उर्वरित रक्कम 9 महिने दरमहा 4 हजार 650 रुपये हप्त्याने भरावे लागतील, असे सांगण्यात आले. यासाठी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकच्या प्रतीही घेण्यात आल्या. इरान यांनी सांगितल्यानुसार हप्ते भरले. मात्र त्यानंतरही त्यांच्या खात्यातून पैसे कट हाेत राहिले. त्यांनी बँकेत चाैकशी केली असता, बँकेने त्यांना अजून 36 हप्ते भरावे लागतील किंवा गाडी जप्त हाेईल, असे सांगितले. आराेपींनी इरान यांच्याकडून खाेटे बाेलून एकूण 3 लाख 12 हजार 400 रुपये घेतले. या प्रकरणी इरान बंदूकिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि केलेल्या चाैकशीनंतर, लकडगंज पाेलिसांनी तीन आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
12 ग्राहकांनाही असाच घातला गंडा
 
 
तपासात आराेपींनी केवळ इरान बंदूकिया यांनाच नव्हे, तर त्यांच्याप्रमाणेच इतर 12 ग्राहकांना अशाच प्रकारे फसवल्याचे उघड झाले आहे. या 12 ग्राहकांकडून आराेपींनी संगनमत करून एकूण 22 लाख 85 हजार 400 रुपयांची रक्कम घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. यासाेबतच अन्य ग्राहकांचीही फसवणूक झाल्याची माहिती समाेर आली.
 
 
पाेलिस उपायुक्तांना साकडे
 
 
सामाजिक कार्यकर्ता वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली 50 हून अधिक पीडितांनी पाेलिस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपायुक्त मदने यांनी तत्काळ दखल घेतली. या प्रकरणात दाेन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.