विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र एसटी हेल्पलाईन लवकरच!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
धाराशिव,
Separate ST helpline for students धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या एसटी प्रवासातील अडचणींचा गंभीर पद्धतीने घेतलेला आढावा घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लवकरच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘एसटी हेल्पलाईन’ सुरू करण्याची घोषणा केली. शाळेला जाताना किंवा शाळेतून परतताना बस वेळेवर न येणे, अचानक रद्द होणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे प्रवासात अडथळे निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे.
 
 

st 
 
धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला दिलेल्या भेटीदरम्यान अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मंत्री सरनाईक यांच्यासमोर स्वतःच्या समस्या मांडल्या. शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दीमुळे थांब्यावर न थांबणे, उशिरा पोहोचणे किंवा अचानक रद्द होणे यामुळे तास चुकणे, परीक्षा बुडणे आणि घरी उशिरा पोहोचल्यामुळे पालकांकडून गैरसमज निर्माण होणे, अशा अडचणी विद्यार्थ्यांनी सांगितल्या. काही प्रसंगी बस उशिराने आल्याने विद्यार्थिनींवर विपरीत परिणाम होऊन आत्महत्येसारख्या घटना घडल्या असल्याचेही समोर आले. या प्रकारांकडे स्थानिक एसटी प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
 
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आली तर त्वरित मदत पोहोचावी म्हणून एसटी महामंडळ लवकरच एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर करणार आहे. तसेच राज्यातील ३१ विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक शाळा आणि महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतील.
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत कठोर भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, बस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांचे तास चुकल्यास किंवा परीक्षा बुडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांच्यावर राहील. शालेय फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या दिवसांच्या नुकसानीइतके दिवस संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, वेळेत आणि सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळाची ही हेल्पलाईन मोठी दिलासादायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.