उमेदवार आले बहिरंगेश्वराच्या चरणी!

कुणाला पावणार लोकांना उत्सुकता

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
भंडारा,
shri-bahirangeshwar-temple : निवडणुकीच्या काळात गर्दी हा राजकीय नेत्यांसाठी ऊर्जा देणारा विषय असतो! देव दिवाळीच्या निमित्ताने हजारो भाविकांपुढे जाऊन अप्रत्यक्षरीत्या "मी उमेदवार " हे सांगण्याची संधी भंडारा नगर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवारांना मिळाली. पण यानंतर मात्र भोलेनाथ कुणाला पावतो, अशी चर्चाच लोकांमध्ये सुरू झाली आहे.
 

J  
 
 
 
ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरात देव दिवाळीच्या निमित्ताने हजारो भाविक एकत्रित आले होते. सध्या भंडारा नगर परिषद अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या निवडणुकीने वातावरण तापले आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना गर्दी हा सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा विषय आहे. कदाचित हेच हेरून काही उमेदवारांनी तर काहींनी आज उमेदवार असले तरी वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या सेवेचा भाग म्हणून सोहळ्यात हजेरी लावली. नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या तीन यावेळीत्यांच्याशी संवाद श्री बहिरंगेश्वरापुढे नतमस्तक झाल्याची दिसत होते. आलेल्या भाविकांच्या गर्दीत मिसळून त्यांच्याशी संवाद साधताना दिसत होते.
 
 
आता यात प्रत्येकाचा निवडणुकीचा स्वार्थ काही ना काही प्रमाणात होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे कधी देव दिवाळीच्या कार्यक्रमात न दिसलेले सुद्धा आज उमेदवार भगवंताच्या आशीर्वादासाठी हात जोडून उभे होते.
 
 
शेवटी परमेश्वराला सर्व भक्त सारखे असले तरी आशीर्वादाची कृपादृष्टी मतदारांच्या रूपाने कुणावर पडते, यावर बरेच काही अवलंबून आहे. देव दिवाळीच्या सोहळ्याला उमेदवारांची उपस्थिती नागरिकांमध्ये बहिरंगेश्वर कुणाला पावणार अशी चर्चा मात्र पेरून गेली.
 
 
श्री बहिरंगेश्वर मंदिरात देव दिवाळीचा देखणा सोहळा
 
 
भंडाऱ्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात देव दिवाळीचा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. महापूजा, महाआरती, भगवान बहिरंगेश्वराची गाथा सांगणारी लघु नाटिका असे विविध या सोहळ्याचे आकर्षण ठरले.
 
 
श्री.बहिरंगेश्वर व श्री रामचंद्र देवस्थान मंदिर समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या ठिकाणी होणारा देव दिवाळीचा सोहळा आपले वेगळेपण जपणारा असतो. भगवंताची महापूजा, महाआरती हा उत्सवाचा नियमित भाग असला तरी यावेळी असर फाउंडेशनच्या कलावंतांनी सादर केलेली भद्रा भगवान बहिरंगेश्वराची गाथा ही लघु नाटीका विशेष आकर्षक ठरली. भगवंतांची संपूर्ण आख्यायिका या नाटिकेतून संपूर्ण आख्यायिका भक्तांपुढे या कलाकारांनी मांडली.
नाटिके पूर्वी भगवान बहिरंगेश्वर, प्रभु श्रीराम, श्री लक्ष्मी नारायणाची महापूजा करण्यात आली. आरती आणि गायन सेवा देवाला अर्पण करण्यात आली.
 
 
यावेळी मंदिराचा गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सदविण्यात आला होता. हजारो पणत्यांच्या मंद प्रकाशात भगवान बहिरंगेश्वराव्हे रूप उजळून निघाले होते. संस्कार भारतीच्या वतीने विशाल अशी रांगोळी रेखाटून या सोहळ्याच्या सौंदर्यात भर घातली होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून देव दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
हजारो भाविकांसाठी मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.