नांदेड,
Sneha Tamshette, young corporator भाजपाच्या स्नेहा तमशेट्टे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका पार पडल्या. नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषदेतून केवळ २१ वर्षांच्या स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका बनण्याचा मान मिळवला आहे.
मुखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ हा महिला ओबीसीसाठी राखीव असून भाजपाने या प्रभागातून स्नेहा तमशेट्टे यांना उमेदवारी दिली होती. सुरुवातीला काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवारांसह एकूण चार उमेदवार रिंगणात होते. मात्र छाननीदरम्यान काँग्रेसचा आणि एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला. अशा परिस्थितीत स्नेहा तमशेट्टे आणि त्यांची चुलती जयश्री तमशेट्टे यांच्यात थेट सामना होणार असे चित्र होते.
पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला, आणि त्यामुळे स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. बिनविरोध निवड होताच प्रभागात आनंदाचा माहोल निर्माण झाला. कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्साहात स्नेहा तमशेट्टे यांचे स्वागत करून अभिनंदन केले. स्नेहा तमशेट्टे यांनी केवळ तरुण वयात लोकांचा विश्वास जिंकत राजकारणात पाऊल ठेवले असून, पूर्वी केवळ २२ व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांच्या विक्रमालाही त्यांनी मागे टाकले आहे. त्यांच्या विजयानंतर भाजपनेही नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीतील पहिले खाते उघडले आहे.