सोलापूर,
Solapur devotees' accident हैद्राबाद महामार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला असून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सोलापूरकडून नळदुर्गकडे जाणारी क्रूझर अचानक टायर फुटल्याने नियंत्रणाविना पलटी झाली आणि समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरात धडकली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवासी सोलापूरजवळील दक्षिण उळे गावातील असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे कार्य करीत आहेत.
अणदुर गावाजवळ झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलिसांनीही तातडीने मदतकार्य सुरू करून अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढली आणि वाहतूक सुरळीत केली. टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.