पथ्रोट,
tiger-search-using-drone-camera : वाघडोह (शहानूर)येथे पहिल्या दिवशी वाघाने जंगली डुकराची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्यावर त्याच रात्री ती शिकार पळवून नेल्यानंतर वन विभागाची टीम त्या गावात मागील सहा दिवसापासून मुक्कामी आहे. ड्रोन कॅमेराच्या साह्याने वाघाचे शोधकार्य करीत आहे. आता त्यांच्या मदतीला अमरावतीहून रेस्क्यू टीमही पोहचली असल्याने वाघाच्या जेरबंदीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाघडोह गावाच्या जवळ रायपूर, चौर्यामल शेतशिवारामध्ये एका कपाशीच्या शेतात पिकाला पाणी देत असताना समोरून वाघ जंगली डुकराची शिकार जबड्यात धरून घेऊन जाताना तेथे उपस्थित असलेल्या रवि राजने या शेतकर्याला दिसला होता. दोघांची नजरानजर झाल्यानंतर त्याने शिकार सोडून राजने यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो पळून गेल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळ गाठून शिकार झालेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. ज्यामध्ये शिकार घेऊन जाताना रात्री बारा वाजताच्या दरम्यान वाघ कॅमेर्यात कैद झाला होता.
घटनेचे गांभीर्य जाणून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मागील सहा दिवसापासून गावात मुक्काम करत दिवस-रात्र वाघाचे शोधकार्य सुरू केले आहे. अशातच दोन दिवसानंतर एका शेळीची शिकार झाल्याने पुन्हा एकदा ट्रॅप कॅमेरे लावत वाघ की बिबट याचा शोध घेणे सुरू झाले आहे. शोधकार्यात मदत मिळावी याकरिता त्यांनी ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर आता त्यांच्या मदतीला हिंस्र प्राणी जेरबंद करणारी अमरावती येथील रेस्क्यू टीम सुद्धा पोहचली आहे. त्या टीमने सुद्धा घटनास्थळाची व परिसराची संपूर्ण पाहणी करून पुढची रणनीती आखली आहे.