तिवसा,
tiwasa news बिबट्याचे साक्षात् दर्शन घडल्यामुळे भीतीने लपून बसलेल्या दोन शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी अखेर वनविभागालाच पाचारण करावे लागले. वनाधिकार्यांनी त्यांना धीर देऊन सुरक्षित बाहेर काढले. तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर, बनसापूर, वाठोडा खुर्द व भांबोरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या वावराने नागरिक घाबरलेले असतानाच २१ नोव्हेंबर रोजी एका मागोमाग दोन धक्कादायक घटना घडल्या आणि संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले.
संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान, खांडेकर यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करताना अचानक बिबट दिसल्याचा व्हिडिओ स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला आणि गावोगावी बातमी वणव्याप्रमाणे पसरली. याच भीतीच्या वातावरणात, सायंकाळी बनसापूर येथे पोल्ट्री फार्मजवळ शेतकरी सागर मोयेकर आणि प्रदीप निवाळ यांच्यासमोर भीषण वास्तव उभे राहिले.बिबट्याने त्यांना समोरासमोर पाहिले. जीवघेणा क्षण ओळखून दोघेही थरथरत शेतातील एका कोपर्यात लपून बसले. घाबरलेल्या युवकांनी किंचितही आवाज न करता मोबाईलवरून गावकर्यांना मदतीसाठी संदेश पाठवला. गावकर्यांनी तात्काळ तिवसा वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी जी. डी. जांभे व एम. डी. गवई यांनी एक क्षणही न दवडता घटनास्थळ गाठले. परिसरात बिबट शिरला असल्याची खात्री असूनही, दोन्ही अधिकार्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता शेतात प्रवेश केला.tiwasa news गावकरी चिंतेने थरारलेले असताना अधिकार्यांनी अत्यंत शांत चित्ताने परिस्थिती हाताळली आणि काही मिनिटांच्या अत्यंत धाडसी प्रयत्नानंतर सागर मोयेकर व प्रदीप निवाळ यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. दोन्ही युवकांच्या सुरक्षित सुटकेनंतर गावात आनंदाचा एकच जल्लोष पसरला. वनाधिकार्यांनी नंतर संपूर्ण परिसराची पाहणी करत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून घराबाहेर पळू नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले. या शौर्यकथेमुळे वनाधिकारी जांभे व गवई यांचे धैर्य, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.