आज नागपूर, उद्या कारपूर, परवा गुन्हेपूर!

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
वेध....
parking problem : लोकसंख्येचा स्फोट होत असल्याचे लक्षात येताच भारत सरकारने नसबंदीचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबविणे सुरू केला होता. आजही एक किंवा दोन अपत्यानंतर नसबंदीसाठी दाम्पत्यांना आग्रह केला जातो. आता अशाच स्वरूपाची नसबंदीरूपी नियंत्रण वाहन विकण्यावर येणे काळाची गरज आहे. लोकांची गरज आहे म्हणून ते वाहने खरेदी करतात. पण वाहन ठेवायला जागाच नाही तरीही त्यांची खरेदी ही लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नागपुरातील ही गंभीर समस्या आज अनेकांना जाणवू लागली आहे. म्हणूनच की काय आज नागपूर, उद्या कारपूर आणि परवा गुन्हेपूर व्हायला वेळ लागणार नाही. ही चिंता केवळ माझीच नाही तर पार्किंग समस्येवरून उद्भवलेल्या वादानंतर संबंधित पीडितांनाही जाणवू लागली आहे.
 
 
 
PARKING
 
 
 
नागपूरची लोकसंख्या 35 लाखांपेक्षा जास्त आहे. तर वाहनांची संख्या 24 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. नागपुरात एमएच 31, एमएच 40 आणि एमएच 49 अशा स्वरूपात वाहनांची नोंदणी केली जाते. सन 2022 मध्ये प्रतिदिन 197 नवीन वाहनांची विक्री होत होती. सन 2023 मध्ये ती संख्या 203 पर्यंत गेली. सन 2024 मध्ये ती वाढून 250 झाली. आता सन 2025 मध्ये तो आकडा 500 पेक्षा जास्त झाला आहे. मान्य आहे की, लोकांकडे खूप पैसा जमा झाला आहे. याचा अर्थ त्यांनी धडाक्यात वाहनांचीच खरेदी करावी काय? याचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल. ‘खिशात नाही दमडी आणि खायला हवी कोंबडी’ ही बाब माणसाला पदोपदी लागू पडते. मग कार किंवा इतर वाहनांची खरेदी करताना जागेचा मुद्दा लागू पडू नये का? पार्किंगचा मुद्दा प्रचंड गंभीर आहे. टोलेजंग घर असले तरी त्यात वाहने ठेवायला जागाच नसते.
 
 
मग ती मंडळी दुसèयांच्या घरापुढे वाहने ठेवतात. तिथेही जागा मिळाली नाही तर रस्त्यावर ठेवून मोकळे होतात. त्या वाहनांमुळे अपघात झाले तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसते. अशा लोकांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी काही युवकांनी कारच्या काचा फोडण्याचा उद्योग सुरू केला होता. पण अशाने ही समस्या सुटणार नाही. कुणाचे नुकसान करून समस्येवर उपाय निघत नसतो. पार्किंगची जागा दाखवा नंतरच कार खरेदी करता येईल अशा स्वरूपाची कडक अमलबजावणी व्हायला हवी. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तगडी करायला हवी. सहजतेने चोवीस तास जाणे येणे होईल अशी माफक व्यवस्था झाल्यास कोणीही वैयक्तिक कारला प्राधान्य देणार नाही. पण त्याकडे होणारे दुर्लक्ष आज नागपूरला गुन्हेपूरकडे ढकलत आहे. जेव्हा वाहतूक पोलिस ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या वाहनांच्या विरोधात कारवाई करतात तेव्हा होणाèया वादविवादांचा एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्या. संपूर्ण शहरात असे अनेक वाद होतात अन् लोकांना दंड भरून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागते. ज्यांना ठेच लागली ते काही दिवसांपुरता सुधारतात पण पुन्हा काही दिवसांनी ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे वागतात. विस्कळीत झालेली वाहतूक आणि कार पार्किंग व्यवस्था या समस्या नागपुरात कुठल्याही क्षणी उद्रेक करू शकतात. त्याचे वेळीच समूळ उच्चाटन झाले तरच बरे होईल.
 
 
अन्यथा झालेला उद्रेक शांत करणे प्रशासनासाठी वेगळी डोकेदुखी ठरू शकते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक उपक्रम सुरू असतात. पण त्यातून फायदा दिसतच नाही. उलट सुशिक्षित लोकांकडून कायद्याचे उल्लंघन वाढले आहे. कार खरेदीतही हीच मंडळी अग्रेसर आहेत. त्यांना रोखणे फार कठीण असले तरी अशक्य नाही. ऑटोमोबाईल उद्योगाची भरभराट व्हायला हवी. पण त्याकरिता लोकांचे जीव घेऊन किंवा लोकांना त्रास देता कामा नये. तसा विचार करता वाहन खरेदी करणाèयांनीच आपली स्थिती समजून घ्यायला हवी. कायदा जरी केला तरी तो पालन करणाèयांनी त्याचा मनापासून स्वीकार केल्यास लाभ होतो. अन्यथा कायदाही निरर्थक ठरतो. म्हणूनच कायद्याने आणि नागरिकांनी आपले नागपूर भविष्यात गुन्हेपूर होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
 
शेवटी, भारतात नागपूर आज हृदयस्थळ म्हणून गणले जाते. या हृदयस्थळाला जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. तेव्हा आज नागपूर, उद्या कारपूर आणि परवा गुन्हेपूर होण्यापूर्वी शासनाने लोकसहभागातून यावर रामबाण तोडगा काढणे काळाची गरज आहे. जेव्हा हे होईल तेव्हाच नागपूर अधिक सुंदर होईल, नाही का?
 
अनिल उमाकांत फेकरीकर
9822468660