वर्धा,
Buddha Vihar theft, शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील रमाई उद्यान भागातील बुद्ध विहारमधून ५ किलो वजनाची पितळेची गौतम बुद्धाची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाचे चक्र फिरवून चोरट्यास जेरबंद केले.
बुद्ध विहारमधून मूर्ती चोरीला गेल्यानंतर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, बोरगाव मेघे येथील महारुद्र हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न देखील चोरट्याने केला होता. तेथे चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासल्यावर पोलिसांनी श्रावण खाकरे (६४) याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपण मूळ नागपूर येथील राजापेठ भागातील रहिवासी असल्याचे सांगितले. शिवाय सध्या जुना पुलगाव येथे राहत असल्याची कबुली दिली. अधिक विचारपूस केल्यावर त्याने बुद्ध विहार आणि हनुमान मंदिरात चोरी केली असल्याची कबुली दिली. हनुमान मंदिरातून चोरट्याच्या हाती काही लागले नाही. पण त्याच्याकडून पोलिसांनी गौतम बुद्धाची मूर्ती व इतर साहित्य हस्तगत केले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मे, शैलेश चाफलेकर, नरेंद्र कांबळे, पवन लव्हाळे, अभिजित वाघमारे यांनी केली.