सेलू,
car accident Selu, पोलिस ठाण्याचे जमादार प्रशांत श्रीवास्तव (५०) यांच्या कारला अपघात होऊन पत्नी गीता (४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रशांत श्रीवास्तव गंभीर जखमी झाले. ही घटना आज २४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास देवरी जिल्हा गोंदिया येथे घडली अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. श्रीवास्तव दाम्पत्य वर्धा शहरा नजिक असलेल्या आलोडी साटोडा परिसरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार सेलू पोलिस ठाण्यात कार्यरत हिंगणी बीटचे जमादार प्रशांत श्रीवास्तव हे पत्नीसह रायपूर (छत्तीसगड) येथे कारने गेले होते. तेथून ते आज सोमवार २४ रोजी परत येत असताना दुपारच्या सुमारास देवरी जवळ वळण रस्त्यावर त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली जात झाडावर जाऊन आदळले. अपघात एवढा जबरदस्त होता की त्याच्या कारचे दार तुटून प्रशांत कारच्या बाहेर फेकल्या गेले. त्यांची पत्नी जागीच ठार झाली. तर त्यांच्या डोयाला व हाताला जबर दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.