धर्मेंद्र आणि मराठीचा अनोखा बंध...

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Dharmendra and Marathi's bond हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूडमध्ये ‘अँग्री यंग मॅन’, राकट नायक आणि देखण्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र रुपेरी पडद्यावर अनेक दशकं अधिराज्य गाजवत राहिले. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही त्यांनी मानवी नातेसंबंधांना कधीही तिलांजली दिली नाही. त्यांची सहृदयी, मैत्रीला जागणारी ओळख चित्रपटसृष्टीत विशेष मानली जाते. याच मैत्रीपोटी धर्मेंद्र यांनी हिंदीतील सुपरस्टार असूनही एका मराठी चित्रपटासाठी खास गाण्याचे शूटिंग केले होते.
 
 

dharmendra 
ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी याबद्दलची आठवण सांगितली. मुंबईच्या चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे अत्यंत जिवलग मित्र. त्या काळात हिंदीतील मोठे नायक लहान बजेटच्या किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक नसत. पण धर्मेंद्र यांनी मैत्रीला प्राधान्य देत हेमंत कदम यांच्या ‘हिचं काय चुकलं’ या मराठी चित्रपटातील ‘घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव…’ या गाण्यासाठी विक्रम गोखलेंसोबत विशेष शूटिंग केले.
त्यांच्या बिझी शेड्युलमधून दोन दिवस काढून धर्मेंद्र थेट चांदिवलीत पोहोचले आणि गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. त्या काळात धर्मेंद्र यांच्या उपस्थितीमुळे हे गाणे आणि चित्रपट दोन्हीही प्रचंड लोकप्रिय ठरले होते, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची जुनी आठवण, मैत्रीची नाळ आणि सहृदय स्वभाव अधोरेखित करणाऱ्या अशा अनेक कथा पुन्हा समोर येत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी घरातील सूत्रांनी त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती नुकतीच दिली होती. मात्र, आज सकाळी सर्वांना दुःखद धक्का देत त्यांनी जगाचा निरोप घेतला.