मुंबई,
Dharmendra's last dialogue ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी, वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाल आजाराशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १२ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरीच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या जाण्याची दुःखद बातमी समोर आली.

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या आधीच त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. ‘इक्कीस’ असे नाव असलेला हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फर्स्ट लूक पोस्टरमधील धर्मेंद्र यांचा भावुक संवाद ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले. या चित्रपटात त्यांनी २१ वर्षांच्या शहीद जवानाच्या वडिलांची, म्हणजे ब्रिगेडिअर एम.एल. खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. पोस्टरसोबत जोडलेला त्यांचा शेवटचा डायलॉग “मेरा बड़ा बेटा अरुण ये हमेशा इक्कीस का ही रहेगा” त्यांच्या धीरगंभीर आवाजात ऐकू येतो आणि मनाला चटका लावून जातो.
चित्रपटात अगस्त्य नंदा लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार असून १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या अद्वितीय शौर्याची कथा ‘इक्कीस’ मधून उलगडणार आहे. अरुण खेत्रपाल यांना युद्धातील शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले होते. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील एक भावनिक ठसा उमटवून जाणार आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग समाप्त झाले आहे.