बुलढाणा,
Dr Kiran Patil appeal जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या फार्मर नोंदणी असलेल्या ५ लाख ६ हजार ८३१ शेतकर्यांच्या बँक खात्यात ३५० कोटी रुपयांची मदत डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे नुकसान भरपाई वितरित करण्यात अडचणी येत असून उर्वरित शेतकर्यांनी तत्काळ आपला फार्मर आयडी काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५ लाख ९६ हजार १४५ शेतकर्यांच्या मदतीसाठी ४१० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्यापैकी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असलेल्या शेतकर्यार्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा करण्यात आली आहे. परंतू उर्वरित शेतकर्यांनी अद्यापही आपले फार्मर आयडी काढलेले नसल्याने शेती पीक नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत जवळच्या सीएससी केंद्रावर जावून आपला फार्मर आयडी तत्काळ तयार करुन घेणेयाचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी केले आहे.
२९ एप्रिलच्या शासन परिपत्रक व १० अॅाटोबरच्या शासन निर्णयान्वये ज्या शेतकर्याचे अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होवून अॅग्रिस्टॅकमध्ये ईकेवायसी झाली आहे अशा शेतकर्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी (डिबीटीव्दारे मदत वितरणासाठी आवश्यक) ई के वायसी प्रक्रियेपासून सुट देण्यात येत आहे असे निर्देश आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅकअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावून तत्काळ तयार करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व संयुक्त खातेदार व सामाईक खातेदार यांनी प्रत्येक सहधारकांचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावा. मदतीचा लाभ घेण्यासाठी सामाईक शेती असलेल्या लाभधारक शेतकर्यांनी संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असून शेतकरी ओळख क्रमांक असेल तरच शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरण (ईकेवायसी) ची आवश्यकता राहणार नाही. अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. फार्मर आयडी बनवला नाही तर पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पिक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.